हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील आरोपीस नेपाळ बॉर्डरवरुन अटक
पगारावरुन मित्राच्या भावावर चाकू हल्ला केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जानेवारी 2026
मुंबई, – हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपी नेपाळ बॉर्डरवरुन खार पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. पगार दिला म्हणून त्याने त्याच्या मित्राच्या भावावर चाकूने हल्ला करुन पलायन केले होते. रामकिशुन ऊर्फ कृष्णा असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हरिशंकर मोतीराज जांगीड हे नालासोपारा येथील तुळीज रोड, शिव-आर्शिर्वाद अपार्टमेंटमध्ये हरिशंकर मोतीराम जांगीड हे राहत असून ते कारपेटरचे कंत्राट घेतात. त्यांच्याकडे कृष्णा हा कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात पगारावरुन वाद सुरु होता. वारंवार विचारणा करुनही हरिशंकर त्याला पगार देत नव्हते. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. 29 डिसेंबरला सायंकाळी पावणेसहा वाजता तो खार येथील सोळावा रस्ता, ट्युलिप इमारतीच्या कामाच्या ठिकाणी आला होता. तिथे हरिशंकर यांचा भाऊ मनोज मोतीराम जांगीड होता. त्याने त्याच्याशी पगारावरुन वाद घालण्यचा प्रयत्न केला होता.
याच भांडणानंतर त्याने मनोजवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्या गळ्यावर, खांद्यावर वार केले होते. या हल्ल्यानंतर तो पळून गेला होता. जखमी झालेल्या मनोजला नंतर जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हरिशंकर यांच्या तक्रारीवरुन खार पोलिसांनी कृष्णाविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याच्या मोबाईलवरुन तो वसईतील नातेवाईकाकडे गेल्याचे समजले. त्यामुळे तिथे पोलीस गेले होते. यावेळी या नातेवाईकांनी तो उत्तरप्रदेशला गेल्याचे सांगितले. त्यामुळे एक टिम उत्तरप्रदेशलाद गेली होती.
मात्र तो स्वतच्या गावी न जाता दुसर्या गावात राहणार्या नातेवाईकाकडे गेला होता. तिथे पोहचण्यापूर्वीच तो पळून गेला होता. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर साध्या वेशात पाळत ठेवली होती. अखेर कृष्णाला सोमवारी नेपाळ बॉर्डरवरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मनोजवर पगारावरुन चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली. ट्रॉन्झिंट रिमांडनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांब्ळे, पोलीस उपनिरीक्षक हणमंत कुंभारे, माणिक घोगरे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मेंगडे, प्रतिभा पवार, पोलीस हवालदार कुंदन कदम, आनंद निकम, पोलीस शिपाई महेश लहामगे, नितीन कोळेकर, अजीत जाधव, विशाल भामरे, संतोष कांबळे, सुमीत अहिवळे, गणेश खेडकर, सचिन चव्हाण, स्वप्नील काकडे यांनी केली.