मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – खार येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या सुमारे 45 लाख रुपयांच्या 91 किलो चांदीचा अपहार करुन दोन कारागिराने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही कारागिराविरुद्ध खार पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पेश मिस्त्री आणि समीर मिस्त्री अशी या दोघांची नावे असून या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
यातील वयोवृद्ध तक्रारदार खार परिसरात राहतात. याच परिसरातील अठराव्या रोडवर एक लक्ष्मीनारायण मंदिर असून तिथे त्या ट्रस्टी म्हणून काम करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या परिचित कारागिर अल्पेश आणि समीर मिस्त्री यांना मंदिराच्या फर्निचर आणि दरवाज्याच्या डिझाईनसाठी शुद्ध चांदी दिली होती. फर्निचरसह दरवाज्याचे चांदी बनवून देतो असे सांगून ते दोघेही पळून गेले होते. दिलेल्या मुदतीत त्यांनी चांदीचे फर्निचर आणि दरवाजा बनवून दिला नाही. त्यामुळे तिने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
ते दोघेही मालाड परिसरात राहतात. त्यामुळे तिथेही जाऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र ते दोघेही पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. या दोघांनी 45 लाख 50 हजार रुपयांच्या 91 किलो शुद्ध चांदीचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच या वयोवृद्ध ट्रस्टीने खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अल्पेश आणि समीर मिस्त्री यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.