मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२४
मुंबई, – सिझोफानिया या त्रस्त असलेल्या एका ३६ वर्षांच्या महिलेने तिच्याच दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची घरातच वायरने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. सर्वेश रविंद्र औटे असे या दहा वर्षांच्या मुलाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी अभिलाषा रविंद्र औटे या आरोपी आईविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत केलेल्या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. स्वतच्या मुलाची आईने केलेल्या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणेआठ वाजता वांद्रे येथील वाय कॉलनीत घडली. या कॉलनीतील तिसर्या मजल्यावरील रुम क्रमांक ८० मध्ये रविंद्र दिगंबरराव औटे हे त्यांची पत्नी अभिलाषा आणि दहा वर्षांचा मुलगा सर्वेश यांच्यासोबत राहत होते. ते सध्या गृहमंत्रालयात उपसचिव म्हणून कामाला आहेत. त्यांची पत्नी अभिलाखा हिला सिझोफानिया नावाचा एक आजार असून त्यावर तिच्यावर उपचार सुरु आहेत. क्षुल्लक कारणावरुन ती घरात कधी प्रचंड आक्रमक तर अतिप्रेमळ वागत होती. ती आक्रमक झाली की कोणाचेही ऐकत नव्हती. प्रेमाने वागू लागली की एखाद्यावर प्रचंड जीव लावत होती. तिच्या या विचित्र वागणुकीमुळे त्यांना सुरुवातीला काहीच कळत नव्हते. गुरुवारी सायंकाळी ती तिच्या दहा वर्षांच्या मुलासोबत घरातच होती.
सायंकाळी पावणेआठ वाजता तिने अचानक रुमचा दरवाजा आतून बंद केला. आणि बेडरुममध्ये असलेल्या तिचा दहा वर्षांचा मुलगा सर्वेश याची वायरने गळा आवळून हत्या केली होती. हा प्रकार नंतर रविंद्र यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्वेशला तातडीने जवळ्च्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सर्वेशचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी रविंद्र औटे यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी स्वतच्याच मुलाची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी अभिलाखा हिच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तिला शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. तिची पोलिसांकडून लवकरच मेडीकल केली जाणार आहे. त्यात तिच्या आजाराबाबत डॉक्टराकडून अभिप्राय मागविला जाणार आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.