मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
ठाणे, – माजी नगरसेविकेच्या पतीचे अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी वीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्या एका टोळीचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तिन्ही अपहरणकर्त्यांना अटक करुन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका केली. गिरीश रमेश खैरे, विनयकुमार कृष्णा यादव ऊर्फ राघव, विनायक किसन कराडे अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी तीन फोन, एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुस असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार माजी नगरसेविका आहे. त्यांच्या पतीचे काही अज्ञात व्यक्तींनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी कल्याण येथील सखुबाई पाटील नगर, काका ढाबा मागे एक रुम भाड्याने घेतला होता. तिथे ज्योतिषाला भेटण्याच्या बहाण्याने त्यांच्या पतीला आणून नंतर त्यांचे खंडणीसाठी अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी माजी नगरसेविकाकडे वीस लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने मानपाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध ३०९, १२६, ३(५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संमातर तपास सुरु करुन अपहरणकर्त्यांचा शोध केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड, संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे, महेश राळेभात, प्रशांत आंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर, पोलीस हवालदार राजकुमार खिलारे, गिरीश पाटील, सुनिल पवार, संजू मासाळ, विकास माळी, दिपक गडगे, निसार पिंजारी, पोलीस नाईक गणेश भोईर, प्रविण किनरे, यल्लापा पाटील, देवा पवार, अनिल घुगे, रवि हासे, पोलीस शिपाई अशोक आहेर, विजय आव्हाड, महेंद्र मंझा, नाना चव्हाण, धनश्याम ठाकूर यांंनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन कोळसेवाडी, तिसगाव नाका, चक्कीनाका परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या गिरीश खैरे, विनयकुमार यादव आणि विनायक कराडे या तिघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.
चौकशीत या तिघांनीच नगरसेविकेच्या पतीचे खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली होती. तसेच त्यांच्या सुटकेसाठी वीस लाखांची मागणी केली होती. गिरीश खैरे याने त्यांचे अपहरण करुन त्यांना इमारतीच्या भाड्याच्या रुममध्ये डांबून ठेवले होते. त्यांच्या आयुष्याचे सर्व अडचणी होतील असे सांगून त्यांना ज्योतिषाकडे विनायक घेऊन आला होता तर विनयकुमारने गुन्ह्यांसाठी बिहार येथून घातक शस्त्रे आणली होती. अपहरणानंतर या तिघांनी त्यांना रस्सीने बांधून ठेवले होते. त्यानंतर याच परिसरात अपहरण करण्यात आलेल्या बळीत व्यक्तीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी मोबाईलसह घातक शस्त्रे असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.