मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून एका १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करुन त्याच्या सुटकेसाठी नातेवाईकाकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी चार खंडणीखोरांना गुन्हा दाखल होताच मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक लवकुश सिंग, अजय सुरेशचंद्र पांडे, प्रदीप विरेंद्र सिंग आणि अन्वर निशाद खान अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण कांदिवलीतील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमीत धुमाळ यांच्याकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
५३ वर्षीय तक्रादार महिला कलीमुनिसा युसूफ खान ही मालाडच्या मालवणी, गेट क्रमांक तीन परिसरात राहते. तिचा अमानउल्ला मैनुद्दीन अन्सारी हा भाचा असून तो याच परिसरात राहतो. ममंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता त्याचे चारजणांच्या एका टोळीने टेम्पोतून अपहरण केले होते. त्याच्या सुटकेसाठी त्यांनी कलिमुनिसा खान हिच्याकडे ३३ हजाराची खंडणीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर अमानतुल्लाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे खंडणीची मागणी करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणासह खंडणी व इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमीत धुमाळ व अन्य पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना गोरेगाव येथील राममंदिर परिसरातून अभिषेक सिंग, अजय पांडे, प्रदीप सिंग आणि अन्वर खान या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या तावडीतून पोलिसांनी अमानतुल्लाची सुखरुप सुटका केली. तपासात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावरुन चालताना अमानतुल्लाची आरोपीशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात या चौघांनी त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला त्यांच्या टेम्पोमध्ये कोंडून ठेवून त्याचे अपहरण केले. त्याच्या सुटकेसाठी नातेवाईकाकडे खंडणीची मागणी केली होती. मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलीस उपनिरीक्षक अमीत धुमाळ व त्यांच्या सहकार्यांनी चारही आरोपींना अटक करुन अमानतुल्लाची सुखरुप सुटका केली.
अटकेनंतर चारही आरोपींना दुसर्या दिवशी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी चारही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चारही आरोपी कांदिवलीतील जानूपाडा, पोईसर, लोखंडवालाचे रहिवाशी आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.