कापड व्यापार्याच्या अपहरणासह खंडणीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश
कांदिवलीतून तिघांना अटक तर गोरेगाव येथून व्यापार्याची सुटका
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – गुजरातचे कापड व्यापारी असलेले केशवजी भीमाभाई चौधरी या 60 वर्षांच्या वयोवृद्धाच्या अपहरणासह खंडणीच्या गुन्ह्यांचा वाकोला पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत कांदिवली येथून तीन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली तर अपहरण झालेल्या कापड व्यापार्याची गोरेगाव येथील एका फ्लॅटमधून सुटका करण्यात आली. खंडणीसाठी या तिघांनी केशवजी यांना बेदम मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. राधेश्याम मेवालाल सोनी, सतीश नंदलाल यादव आणि धर्मेंद्र रामपती रविदास अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
42 वर्षांचे तक्रारदार महेशकुमार केशवजी चौधरी हे मूळचे गुजरातच्या कच्छ, बच्छावचे रहिवाशी असून सध्या ते सांताक्रुज येथील वाकोला, प्रभात कॉलनीत राहतात. त्यांचा स्वतचा कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांचे वयोवृद्ध वडिल केशवजी आणि गावी त्यांच्या गावी राहतात. त्यांच्या वडिलांचाही कपड्याचा व्यवसाय असून ते गुजरात येथून कपडे आणून त्याची मुंबई शहरात विक्री करतात. दर दोन ते तीन महिन्यानंतर ते मुंबईत येतात. मुंबईत आल्यांनतर ते त्यांच्याकडे राहतात. गुरुवारी 20 फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजता त्यांचे वडिल केशवजी हे बच्छाव रेल्वे स्थानकातून कच्छ एक्सप्रेसने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना फोनवरुन ही माहिती दिली होती. मात्र ठरलेल्या वेळेत त्यांचे वडिल घरी आले नाही, त्यांना कॉल केल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या वडिलांची चौकशी केली होती. मात्र ते त्यांच्याकडे गेले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचा शोध सुरु केला होता. मात्र बराच शोध आणि विचारपूस करुनही त्यांना त्यांच्या वडिलांविषयी काहीच माहिती मिळाली नाही.
चार दिवसांनी त्यांच्या मोबाईलवरुन त्यांना त्यांच्या वडिलांनी कॉल केला होता. यावेळी त्यांनी अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले असून त्यांच्या सुटकेसाठी पैशांची मागणी करत आहेत अशी माहिती सांगितली. याच दरम्यान दुसर्या व्यक्तीने त्यांचा फोन घेतला आणि त्यांच्या वडिलांचे अपहरण झाल्याचे सांगून त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे 68 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांच्या वडिलांच्या हत्येची धमकी दिली होती. काही वेळानंतर या व्यक्तीने त्यांना पुन्हा फोन करुन एका अंगाडियामार्फत त्यांना 25 लाखांचा पहिला हप्ता पाठविण्यास सांगितले. या प्रकारानंतर महेशकुमार चोधरी हे प्रचंड घाबरले होते. घडलेला प्रकार त्यांनी वाकोला पोलिसांना सांगून अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणासह खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा अतिशय संवेदनशील आणि ज्येष्ठ नागरिकाचे अपहरणाचा असल्याने त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत झोनच्या सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर चार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली हाती. या पथकाला वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आले होते. आरोपी त्यांचे लोकेशन सतत बदलत होते. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना कांदिवलीतील लालजीपाडा परिसरातून पोलिसांनी राधेश्याम सोनीसह इतर दोघांना अटक केली. यातील राधेश्याम हा आयुवैदिक प्रोडेक्ट विक्रेता असून तो मालाडच्या ऑर्लेम, चिंचपाडा परिसरात राहतो. सतीश यादव हा कांदिवलीतील हनुमाननगर, रमनाथ चाळीचा रहिवाशी असून तो विमा सल्लागार म्हणून काम करतो तर धर्मेद्र रविदास हा सुरक्षारक्षक असून तो गोरेगाव येथील प्रेमनगरात राहतो.
त्यांच्या चौकशीतून त्यांनीच केशवजी यांचे अपहरण करुन त्यांना राममंदिर येथील एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकून केशवजी यांची सुखरुप सुटका केली. तपासात केशवजी यांचा राधेश्याम हा परिचित असून त्यांच्यात आर्थिक वाद होता. याच वादातून त्याने त्याच्या इतर दोन सहकार्यांच्या मदतीने केशवजी यांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या मुलाकडे 67 लाखांची मागणी करुन त्यातील 25 लाखांचा पहिला हप्ता अंगाडियामार्फत पाठविण्याची धमकी दिली होती. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर या तिघांनाही बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त दौलत साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल पालांडे, सुनिल केंगार, अरुण बंडगर-वाकोला पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मांडोळे-विलेपार्ले पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बनकर-निर्मलनगर पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक मांजरे – सहार पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक बागल-बीकेसी पोलीस ठाणे, पोलीस हवालदार मसणे, मादगुंडी, इंगळे, पोलीस शिपाई वाघमारे, बांबरे, यादव, लोणे, मिस्त्री, उगले, शिंदे, पाटील, महाले, साळवे, सागर गायकवाड यांनी केली.