अपहरणासह खंडणीच्या गुन्ह्यांत मनसेच्या पदाधिकार्यांना अटक
कॉन्ट्रक्टरच्या वडिलांचे अपहरण करुन सुटकेसाठी दहा लाखांची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2025
मुंबई, (प्रतिनिधी) – अपहरणासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मनसेच्या कामगार संघटनेच्या सहा पदाधिकार्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. सुजय शेखर ठोंबरे, सुनिल सखाराम राणे, अरुण हरिश्चंद्र बोरले, अरुण धोंडीराम शिर्के, मनोहर तुकाराम चव्हाण आणि रोहित प्रविण जाधव अशी या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्यावर एका कॉन्ट्रक्टरच्या वडिलांचे अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी दहा लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. यातील सुजय हा कामगार मनसेच्या कामगार संघटनेचा चिटणीस असून त्याच्याविरुद्ध साकिनाका आणि कुर्ला पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील यांनी सांगितले. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विजय पांडुरंग मोरे हा नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर, सेक्टर तीनचा रहिवाशी असून व्यवसायाने कॉन्ट्रक्टर आहे. फोर्ट येथील महात्मा गांधी रोड, बँक ऑफ इंडिया येथे त्याच्या कंपनीकडून काम सुरु होते. तिथे काही कामगार कामाला होते. मात्र सोमवारी सकाळी दहा वाजता सतरा कामगारांनी अचानक काम बंद आदोलन केले होते. त्याचा फायदा घेऊन तिथे मनोहर चव्हाण, सुनिल राणे, सुजय ठोंबरे, अजय शिर्के आणि रोहित जाधव आले. त्यांनी त्यांच्या कंपनीचा सुपरवायझर सुजीतकुमार सरोजला शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी या सर्व आरोपींनी विजय मोरे यांचे वडिल पांडुरंग मोरे यांना जबदस्तीने एका कारमधून बसवून मनसेच्या दादर येथील युनियन कार्यालयात नेले होते. वडिलांच्या सुटकेसाठी काम बंद आंदोलन तडजोडीसाठी त्यांनी त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम घेऊन त्यांना कार्यालयात बोलाविण्यात आले होते.
या प्रकारानंतर विजय मोरे यांनी घडलेला प्रकार आझाद मैदान पोलिसांना सांगून युनियनच्या सहाही पदाधिकार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक दळवी यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक किरण सोनकवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद शहाणे, लिलाधर पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र चांदवडे, पोलीस हवालदार राजेंद्र कटरे, राजेंद्र गायकवाड, पोलीस शिपाई लालसिंग राठोड, सोमनाथ घुगे, ज्ञानेश्वर मुंडे, सचिन पाटील, दिपक पवार, गोपीनाथ पाटील यांनी तपास सुरु केला होता.
आरोपींचा शोध सुरु असताना या पथकाने सहाही आरोपींना अटक केली. या सहाजणांविरुद्ध अपहरणासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत रात्री उशिरा सर्वांना पोलिसांनी अटक केली. सहाही आरोपी मनसेचे पदाधिकारी असून त्यांच्यावर युनियनची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा थारची कार पोलिसांनी जप्त केली आहे.