अपहरणासह खंडणीच्या गुन्ह्यांत दोन आरोपींना अटक

इतर सातजणांचा सहभाग असल्याचे तपासात उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑगस्ट 2025
मुंबई, – अपहरणासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींना समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य आनंद दरेकर आणि शबीर अब्दुल रहिम खान अशी यादोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एका तरुणीची छेड काढल्याचा आरोप करुन या टोळीने एका 27 वर्षांच्या तरुणाचे अपहरण करुन त्याच्या सुटकेसाठी त्याच्या पत्नीकडे एक लाखांची खंडणीची मागणी केली होती. या गुन्ह्यांत इतर सातजणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

खुशबू शुभम साहू ही महिला तिचा पती शुभम याच्यासोबत कांदिवलीतील पोयसर, बिहारी टेकडी, गोपाळ पांडे चाळीत राहते. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता शुभम याचे श्यमेश दिलीप दरेकरसह इतर सात ते आठजणांची अपहरण केले होते. त्यानंतर त्याला रुममध्ये कोंडून तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या अपहरणाची माहिती नंतर त्याची पत्नी खुशबू हिला फोनवरुन देऊन त्यांनी तिच्या पतीच्या सुटकेसाठी एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्याच्या पतीने एका तरुणीची छेड काढली आहे. त्याचे त्याला परिणाम भोगावे लागतील असे सांगून या अपहरणकर्त्यांनी त्याच्या सुटकेसाठी एक लाख रुपये दिले नाहीतर त्याचा मृतदेह घरी पाठविण्याची धमकी दिली होती.

या प्रकाराने खुशबू ही प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार समतानगर पोलिसांना सांगून संबंधित अपहरणकर्त्यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह खंडणीसाठी धमकी देणे आणि अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रविवारी रात्री उशिरा आदित्य दरेकर आणि शबीर खान या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

त्यांच्या चौकशीत त्यांनीच शुभमचे खंडणीसाठी अपहरण तसेच त्याच्या सुटकेसाठी त्याच्या पत्नीकडे एक लाखांची खंडणीची मागणी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत त्यांच्यासह इतर सातजणांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. या सर्वांची नावे पोलिसांना समजली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर या दोघांनाही सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page