अपहरणासह सामूहिक लैगिंक अत्याचाराप्रकरणी पाच आरोपी दोषी
वेगवेगळ्या कलमांतर्गत वीस वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी सहापैकी पाच आरोपींना दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने दोषी ठरविले, या पाचही आरोपींना वेगवेगळ्या कलमांतर्गत वीस वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. राहुल रमेश गेचंद, नितीन किरसन सारसार, विजय किसन गुस्सार, बॉबी किसन गुस्सार आणि सनी ब्रम्हा बागडी अशी या पाचजणांची नावे आहेत. पुराव्याअभावी एका आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली होती. नऊ वर्षांपूर्वी मालाड परिसरात घडलेल्या या अपहरणासह सामूहिक लैगिंक अत्याचाराच्या घटनेने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पिडीत मुलगी ही अल्पवयीन असून ती तिच्या नातेवाईकासोबत राहत होती. नऊ वर्षांचे या मुलीचे एका टोळीने अपहरण केले होते. त्यानंतर तिला बिचवर नेऊन तिच्यावर पाचजणांनी आळीपाळीने सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता. ही मुलगी अचानक मिसिंग झाल्याने तिच्या पालकांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना ही मुलगी पोलिसांना सापडली होती. तिची मेडीकल केल्यानंतर तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दिडोंशी पोलिसांना तपासाचे आदेश देताना आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर काही तासांत वेगवेगळ्या परिसरातून या पाच आरोपीसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. चौकशीदरम्यान त्यांनीच या पिडीत मुलीवर आळीपाळीने सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या आरोपीविरुद्ध विशेष पोक्सो कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.
याच दरम्यान पाच आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली तर एक आरोपी गेल्या नऊ वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत होता. या खटल्याची नियमित सुनावणी विशेष पोक्सो कोर्टाचे न्यायमूर्ती एम. एच पठाण यांच्या कोर्टात सुरु होती. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली. यावेळी न्या. एम. एच पठाण यांनी एका आरोपीची निर्दोष सुटका केली तर इतर पाच आरोपींना दोषी ठरविले होते. शुक्रवारी 28 मार्चला या पाचही आरोपींना शिक्षा सुनावणयात आली. त्यात अपहरणाच्या कलमांत तीन वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजाराचा दंड, दंड न भरल्यास आणखीन सहा महिने कारावास, सामूहिक लैगिंक अत्याचाराच्या कलमांतर्गत वीस वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन एक वर्ष कारावासाची शिक्षेचा तरतूद करण्यात आली आहे.
या खटल्यात सरकारी वकिल म्हणून इम्रान शेख व उषा जाधव यांनी तर आरोपींच्या वतीने वकिल अरुण जाधव, जगताप आणि सिंग यांनी युक्तिवाद केला होता. या गुन्ह्यांचे आरोपपत्र तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दाखल केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सर्वोत्तम भोगले, पोलीस हवालदार प्रकाश तांबे, महिला पोलीस हवालदार शोभा झोडगे, महिला पोलीस शिपाई उज्जवला माळी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले तसेच समन्स व कार्यालयीन कामकाज पोलीस हवालदार कर्पे, पोलीस शिपाई माने, पाटील, भोसले यांनी पाहिले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिडोंशी विशेष पोक्सो कोर्टात योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.