अपहरणानंतर सहकार्याची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
हत्येसह रॉबरी व हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तिघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – अपहरणानंतर एशानअली अन्सारी नावाच्या एका व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह चेंबूर येथील छेडानगर परिसरातून फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एशानअलीच्या तीन परिचित सहकार्यांना साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. वाजिदअली, निसारअली आणि हकीकत अली अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अपहरणासह हत्या, हत्येचा पुरावा नष्ट करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.
एशानअली हा साकिना परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. तो हातगाडी चालविण्याचे काम करत होता. त्याला मालवाहतूकीचे काम मिळत होते. गेल्या काही दिवसांत त्याच्याकडे कामाचा प्रचंड व्याप होता, दुसरीकडे त्याचे परिचित वाजिदअली, निसारअली आणि हकीकत हेदेखील हातगाडीवर काम करत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्याकडे काहीच काम नव्हते. त्यात एशानअलीला प्रचंड काम मिळत असल्याने त्यांना त्याच्यावर राग होता. त्यातून या तिघांनी त्याच्या हत्येची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे 7 ऑक्टोंबरला ते तिघेही एशानअलीला भेटले होते.
भिवंडी येथे त्यांना एक मोठे काम मिळाल्याचे सांगून त्यांनी त्याला त्यांच्यासोबत भिवंडी येथे येण्यास सांगितले होते. त्यामुळे एशानअली हा त्यांच्यासोबत निघून गेला होता. त्याला या तिघांसोबत जाताना त्याचा भाऊ मुनवर अलीने पाहिले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत मुनवरला त्याचा भाऊ एशानअली हा घरी न आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. रात्री तो तिन्ही आरोपीकडे गेला होता, मात्र ते तिघेही तिथे नव्हते. त्यामुळे त्याने त्याचा भाऊ एशानअली याची साकिनाका पोलिसांत मिसिंग तक्रार केली होती.
या तक्रारीत त्याने त्याच्या भावासोबत तिन्ही आरोपींना जाताना पाहिल्याचे सांगितले होते. त्याने या तिघांवर भावाच्या मिसिंग होण्याबाबत शंका उपस्थित केली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी तिन्ही आरोपींना सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ धवणे व अन्य पोलीस कर्मचार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
सुरुवातीला त्यांनी एशानअलीच्या अपहरणामागे त्याचा हात नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी इंगा दाखविताच त्यांनी त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह चेंबूरच्या छेडानगर परिसरात टाकून हत्येचा पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर त्याच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली कॅश या तिघांनी लुटल्याचे सांगितले.
या कबुलीनंतर या तिघांविरुद्ध अपहरणासह हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. कामाच्या वादासह पैशांसाठी या तिघांनी ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.