अपहरणासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक
गेल्या ४० वर्षांपासून वॉण्टेड होता; आग्याहून घेतले ताब्यात
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – अपहरणासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड वयोवृद्ध आरोपीस ४० वर्षांनंतर अटक करण्यात डी. बी मार्ग पोलिसांना यश आले आहे. पापा ऊर्फ दाऊद बंदू खान असे या ७० वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले. जामिनावर बाहेर आल्यानंतर पापा हा त्याचे घर विकून कुटुंबियांसोबत पळून गेला होता, त्यामुळे त्याला कोर्टाने फरारी आरोपी घोषित करुन त्याच्याविरुद्ध स्टॅडिंग अजामिनपात्र वॉरंट जारी केल्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.
पापा हा ग्रॅटरोड येथील पठ्ठे बापूराव रोड, आठवी क्रॉस गल्ली, फॉक्लंड रोडच्या राजकोटवाला इमारतीच्या रुम क्रमांक चौदामध्ये राहत होता. १९८४ साली त्याच्याविरुद्ध अपहरणासह लैगिंक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. काही महिन्यानंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर येताच २५ वर्षापूर्वी तो त्याचे राहते घर विकून कुटुंबियांसोबत पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याला विशेष सेशन कोर्टाने फरारी आरोपी घोषित करुन त्याच्याविरुद्ध स्टॅडिंग अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. आरोपीला अटक करुन हजर करण्याचे आदेशच कोर्टाने डी. बी मार्ग पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर त्याचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. गेल्या ४० वर्षांपासून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच पोलीस हवालदार विनोद राणे हे त्याच्या परिचित आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहून त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते.
चौकशीदरम्यान पोलीस हवालदार विनोद राणे यांना पापा हा आग्रा येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठांना ही माहिती सांगितल्यानंतर डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक आग्रा येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पापाची माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी तो त्याच्या कुटुंबियांसोबत आग्रा येथील हरिपर्वत, आजम खान घटिया, मोतीलाल नेरु रोडच्या प्लॉट १६/५३ मध्ये राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त रवी सरदेसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष कोयंडे, पोलीस हवालदार विनोद राणे, पोलीस शिपाई विश्राम महाजन, प्रविण राठोड आणि सचिन कुमावत यांनी पापाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तो वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.