43 लाखांचा अपहार करुन खाजगी अॅक्टिंग इन्स्टिट्यूटची फसवणुक
इन्स्ट्यिूटच्या अकाऊंटविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जुलै 2025
मुंबई, – विश्वासाने अकाऊंट विभागाची जबाबदारी सोपविलेल्या अकाऊंटटने एका खाजगी अॅक्टिंग इन्स्ट्यिूटच्या सुमारे 43 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी इन्स्ट्यिूटचा अकाऊंटट प्रविण अमरलाल श्रीवास्तव याच्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रविण हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
76 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार किशोर नमीत वझीरचंद कपूर हे व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. गेल्या 25 वर्षांपासून ते अंधेरीतील चारबंगला, म्हाडा परिसरात किशोर नमीत कपूर अॅक्टिंग इन्स्टिट्यूट चालवितात. त्यात बॉलीवूडसह मालिकांमध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असलेले अनेक नवोदित तरुण-तरुणींना अॅक्टिंग, डान्सची शिकवणी दिली जाते. दिवसभरात चार ब्रॅच चालत असून प्रत्येक ब्रॅचेसमध्ये 35 ते 40 मुलांचा सहभाग असतो. 2010 साली त्यांच्याच इन्स्टिट्यूटमध्ये प्रशांत श्रीवास्तव याने सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केला होता. कोर्स पूर्ण झाल्याने त्याने त्यांच्याकडे फिल्ममध्ये काही काम असल्यास सांगण्याची विनंती केली होती. त्याच्याकडे काहीच काम नसल्याने त्यांनी प्रशांतला त्यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला ठेवले होते.
2015 साली त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी त्याचा भाऊ प्रविण श्रीवास्तवकडे काहीच काम नसल्याने त्यासाठी नोकरीविषयी विचारणा केली होती. प्रशांत हा त्यांचा विश्वास कर्मचारी असल्याने त्यांनी त्याचा भाऊ प्रविणला त्यांच्याच इन्स्टिट्यूटमध्ये अकाऊंट विभागात नोकरी दिली होती. ऑक्टोंबर 2016 पासून तो त्यांच्या इन्स्टिट्यूटचे सर्व आर्थिक व्यवहार पाहत होता. तसेच त्यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलाच्या बँक खात्यातील सर्व व्यवहाराची त्याच्यावर सोपविणत आली होती. त्यामुळे त्यांचे डेबीट, क्रेडिट कार्ड व पासवर्डची सर्व माहिती त्याच्याकडे देण्यात आले होते.
चार वर्ष त्याने प्रामाणिकपणे काम केले. 2023 नंतर त्यांच्या इन्स्टिट्यूमध्ये नवीन ब्रॅचेसमध्ये मुलांची संख्या कमी होऊ लागली होती. त्यामुळे त्यांनी प्रविणला इन्स्ट्यिूटच्या नवीन ब्रॅचेसच्या जाहिरातीबाबत विचारणा केली होती, यावेळी त्याने जाहिरात दिल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात त्याने नवीन ब्रॅचेसची जाहिरात दिली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौकशीनंतर त्यांना यापूर्वीही दिलेल्या जाहिरातीचे पैसे मिळाले नसल्याने त्यांची जाहिरात प्रसिद्ध झाली नसल्याचे सांगितले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. चौकशीत ऑगस्ट 2023 पर्यंत इन्स्ट्यिूटच्या इंटरनेट, स्टेशनरी, टीडीएस, लाईट, पाणी, क्रेडिट कार्ड तसेच बंगलोचे भाडे असे सुमारे पंधरा लाख रुपये भरले नव्हते. तसेच काही लोक त्यांच्या पैशांसाठी इन्स्टिट्यूटमध्ये सतत येत होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रविणकडे जाब विचारुन आर्थिक व्यवहाराची माहिती मागितली होती. मात्र त्याने व्यवहाराची माहिती दिली नाही. त्यानंतर 1 सप्टेंबर 2023 पासून तो कामावर आला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी इन्स्टिट्यूटच्या सर्व आर्थिक व्यवहाराची पाहणी केली असता प्रविणने इन्स्टिट्यूसह त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलांच्या बँक खात्यातून सुमारे 43 लाखांचा पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचे दिसून आले.
ही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. त्यांच्या डेबीटसह क्रेडिट कार्डवरुन अनेक ऑनलाईन व्यवहार केले होते. एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत त्याने हा संपूर्ण आर्थिक घोटाळा केला होता. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी काही व्यवहाराची नोंद डिलीट केली होती. प्रविणने हा घोटाळा केल्याचे लक्षात येताच किशोर कपूर यांनी वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रविण श्रीवास्तव याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.