मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मे २०२४
कोल्हापूर, – पूर्ववैमस्नातून विकास आनंदा पाटील या ४० वर्षांच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी चारही आरोपींना ३६ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. युवराज शिवाजी गायकवाड, ओंकार संभाजी वरुटे, सोमनाथ पंडीत वरुटे आणि शरद बळवंत पाटील अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही पुढील चौकशीसाठी पन्हाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
विकास पाटील हा कोल्हापूरच्या पन्हाळा, पार्ले तर्फ ठाणे परिसरात राहत होता. १९ मेला सायंकाळी तो गावातील दूध डेअरीतून दूध घेऊन त्याच्या बाईकवरुन जनावरांच्या गोठ्यात जात होता. यावेळी युवराज गायकवाड व त्याच्या तीन सहकार्यांनी त्याला वाटेत अडविले. त्यांच्यातील जुन्या वादातून या चौघांनी विकासवर काठ्यांनी आणि घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. याप्रकरणी विकासच्या आईच्या तक्रारीवरुन पन्हाळा पोलिसांनी युवराज गायकवाडसह इतर आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता.
या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम होती घेतली होती. हत्येचा गुन्हा दाखल होताच ३६ तासांत तांत्रिक माहितीवरुन स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे कारवाई करुन युवराजसह त्याच्या तिन्ही सहकार्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. यातील युवराज हा कटातील मुख्य आरोपी असून तो सैन्य दलात कामाला आहे. त्यानेच त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने पूर्ववैमस्नातून विकास पाटीलची हत्या केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या चौघांनाही पन्हाळा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पन्हाळा पोलीस ठायाचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, अंमलदार शिवाजी जामदार, विजय गुरखे, संजय पडवळ, ओंकार परब, प्रशांत कांबळे, अमीत मर्दाने, वसंत पिंगळे, संजय हुंबे, अमीत सर्जे, सतीश जंगम, महेश खोत, विनोद कांबळे, सागर माने, रफिक आवळकर, सुशील पाटील यांनी केली.