४५ दिवसांत दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणुक
दोन वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या सान्विक वेल्थ मॅनेजमेटच्या म्होरक्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – गुंतवणुकीवर ४५ दिवसात दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक करणार्या कटातील म्होरक्यास दोन वर्षांनी कोल्हापूर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अक्षय अनिल कांबळे असे या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील व्हाईट कॉलर गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असून गेल्या दोन वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सांगितले.
अक्षय कांबळे हा मूळचा कोल्हापूरचा रहिवाशी असून त्याने काही वर्षांपूर्वी सान्विक वेल्थ मॅनेजमेट नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीत गुंतवणुक केल्यास ४५ दिवसांत दुप्पट परवाता देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेक गुंतवणुकदारांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्या आकर्षक योजनेला भुलून अनेकांनी त्याच्या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र कोणालाही दुप्पट परताता न देता अक्षय कांबळे हा पळून गेला होता. त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे आकर्षक दुप्पट परतावा योजना सुरु करुन फसवणुक केली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शाहूपुरी, गोकुळ शिरगाव, मुरगुड आणि मिरज पोलीस ठाण्यात चारहून अधिक अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता.
गेल्या दोन वर्षांपासून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. अटकेच्या भीतीने तो विविध ठिकाणी नाव बदलून तसेच स्वतचे अस्तिस्त बदलून राहत होता. पळून जाण्यात त्याला त्याच्या कुटुंबियांची मदत होती. त्यांच्याच मदतीने त्याने स्वतचा अपहरणाचा बनाव केला होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या अपहरणाची कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच अक्षय कांबळे हा सादळे परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील,जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे, पोलीस हवालदार बालाजी पाटील, अशोक पोवार यांनी सादळे परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी अक्षय कांबळेला पोलिसांनी शिताफीने अटक केली.
अटकेनंतर त्याला गोकुळ शिरगांव पोलिसांना पुढील चौकशीसाठी ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर त्याचा ताबा इतर पोलीस ठाण्यांना देण्यात येणार आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून गुंतणुकदारांच्या रक्कमेची त्याने कुठे आणि कशी विल्हेवाट लावली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीकडून फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी संबंधित पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी केले आहे.