कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणुक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

सातजणांना अटक व कोठडी; विदेशी नागरिकांना टार्गेट करत होते

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ मार्च २०२४
मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) – कोलकाता येथे सुरु केलेल्या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून भारतीयासह विदेशी नागरिकांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. या टोळीशी संबंधित एका मुख्य आरोपीसह सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. रयान कालौल शाहदास, अरुणभा अमिताभौ हल्डर, रितम अनिमेश मंडल, तमोजीत शेखर सरकार, रजीब सुखचॉंद शेख, सुजोय जयंतो नासकर आणि रोहित बरुन बैद्य अशी या सातजणांची नावे असून ते सर्वजण कोलकाताचे रहिवाशी आहेत. यातील रयान हा या टोळीचा म्होरक्या असून तोच विदेशी नागरिकांना संपर्क साधून त्यांच्या क्रेडिट कार्डसह बँक खात्याची डिटेल्स प्राप्त करुन ऑनलाईन फसवणुक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या आरोपींकडून ५० लाखांची कॅश, २७ मोबाईल, पाच वॉच, तीन एअर बर्ड, एक मॅकबुक, एक आयपॅड, ११ परफ्युम बाटल्या, दोन लेडीज बॅग, दोन फ्रिज, दोन एअरकंडिशनर, दोन प्रिंटर आणि एक किचन चिमनी आदी मुद्देमाल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले. अटकेनंतर सातही आरोपींना किल्ला कोर्टाने मंगळवार १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार चर्चगेट येथील महर्षी कर्वे रोडवर त्यांच्या पत्नीसोबत राहत असून त्यांची स्वतची ट्रॅव्हेल्स एजनसी आहे. त्यांची मुलगी विदेशात राहते. २९ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२४ या कालावधीत त्यांना अज्ञात व्यक्तींनी फोन करुन त्यांच्यासह त्यांच्या मुलीच्या क्रेडिट कार्डसह बँक खात्याची माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार करुन ही रक्कम क्रेडिट कार्डमध्ये वळविण्यात आली होती. या क्रेडिट कार्डवरुन फ्लिपकार्ड, मंत्रा, स्विगीसह अन्य ऑनलाईन पोर्टलचा वापर करुन काही महागड्या वस्तू खरेदी केले होते. अशा प्रकारे अज्ञात सायबर ठगांनी क्रेडिट कार्डसह बँक खात्यातील व्यवहाराबाबत चुकीची माहिती देऊन त्यांची १ कोटी ४८ लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षाच येताच तक्रारदार व्यावसायिकांनी दक्षिण प्रादेशिक सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी ४१९, ४२०, ४६७, १२० ब, भादवी सहकलम ६६ क, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.

तपासात फसवणुक झालेल्या रक्कमेतून मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डवरुन फ्लिपकार्ड, मंत्रा, स्विगीसह इतर ऑनलाईन पोर्टलवरुन महागड्या वस्तू खरेदी करण्यात आले होते. या वस्तूची डिलीव्हरी कोलकाताच्या विविध ठिकाणी झाली होती. हाच धागा पकडून सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण जाधव, मंगेश मजगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे, श्‍वेता कढणे, धनवेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम घोडके, पोलीस नाईक संतोष गलांडे, संदीपान खरजे, प्रविण चाळके, किरण झुंजार, पोलीस शिपाई निखील गाडे यांचे एक विशेष पथक कोलकाता येथे पाठविण्यात आले होते. मात्र मुंबई पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच सर्व आरोपी कोलकाताच्या सिलीगुडी येथे पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी या पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना रयान शाहदास याच्यासह त्याच्या इतर सहा सहकार्‍यांना सिलीगुडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत या टोळीने कोलकाता येथे एक कॉल सेंटर सुरु होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून ते भारतीयांसह विशेषता विदेशी नागरिकांना टार्गेट करत होती. त्यांच्या बँकेचे क्रेडिट कार्डसह खात्यातील व्यवहार ठप्प होणार असून ते सुरळीत करण्यासाठी ही टोळी त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स प्राप्त करत होते. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ऑनलाईन व्यवहार करुन विविध ऑनलाईन पेब पोर्टलवर महागड्या वस्तू खरेदी करत होते. या वस्तूची डिलीव्हरी आल्यानंतर त्याची होलसेलमध्ये मार्केटमध्ये विक्री करुन पैशांचा अपहार करत असल्याचे तपासात उघडकीस आले. तक्रारदारांच्या १ कोटी ४८ लाखांपैकी ६० लाखांच्या महागड्या वस्तू त्यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे डिलीव्हरी केली होती. या वस्तूसह इतर मालाची डिलीव्हरी तात्काळ थांबविण्यात आली आहे. या आरोपींच्या घरातून पोलिसांनी ५० लाखांची कॅश जप्त केली असून ऑनलाईन शॉपिंगद्वारे मागविलेले मोबाईलसह इतर साहित्य ताब्यात घेतले आहेत. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्यांना कोलकाता येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना १६ मार्चपर्यंत ट्रान्झिंट रिमांडवर पाठविले होते. त्यानंतर सातही आरोपींना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. शुक्रवारी सर्व आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना मंगळवार १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page