हत्येसह दरोड्याच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
दरोड्याच्या उद्देशाने बुकीची हत्या केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एपिल 2025
मुंबई, – हत्येसह दरोड्याच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी वांद्रे येथून अटक केली. रबिउलमियाँ ऊर्फ बाबू असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी आहे. गेल्या वर्षी बाबूसह त्याच्या इतर चार सहकार्यांनी मिथुन चक्रवर्ती नावाच्या बुकीची दरोड्याच्या उद्देशाने हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. मुंबई शहरात मजुरीचे काम करताना त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याचा ताबा लवकरच कोलकाता पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.
कोलकाता येथील हत्येसह दरोड्याच्या गुन्ह्यांतील एक वॉण्टेड आरोपी वांद्रे परिसरात राहत असल्याची माहिती युनिट एकच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शेडगे, पोलीस हवालदार विनोद भाडले, दिपक खेडकर, धर्मेंद्र जुवाटकर यानी वांद्रे परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी वांद्रे येथील खेरवाडी, गणेश मंदिर रोड परिसरातून पोलिसांनी रबिउल ऊर्फ बाबू या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान तो कोलकाताच्या मालदा, नलगोला, मोहम्मदपूर पीएसचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्याच्यासह त्याच्या इतर चार सहकार्यांनी गेल्या वर्षी कोलकाता येथे मिथुन चक्रवर्ती या बुकीची दरोड्याच्या उद्देशाने हत्या केली होती.
याप्रकरणी बंसिहारी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध हत्येसह दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली होती. मात्र या दोघांच्या अटकेनंतर बाबूसह इतर दोनजण पळून गेले होते. या तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामिन अर्ज विशेष कोर्टाने फेटाळून लावला होता. तसेच त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या हत्येनंतर बाबू हा पळून गेला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो लोणावळा येथील एका बांधकाम साईटवर मजुर म्हणून काम करत होता.
1जानेवारी 2025 रोजी तो लोणावळा येथून मुंबईत नोकरीसाठी आला होता. तेव्हापासून तो वांद्रे येथील खेरवाडी परिसरात राहत होता. ही माहिती कोलकाता पोलिसांकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे व त्यांच्या पथकाने रबिउलमियाँ ऊर्फ बाबूचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला वांद्रे येथून पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेची माहिती कोलकाताच्या स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी एक टिम मुंबईत येण्यासाठी रवाना झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सांगितले.