क्रिप्टो करन्सीच्या बहाण्याने गंडा घालणार्‍या त्रिकुटास अटक

आंतरराज्य टोळी; इतर काही गुन्ह्यांची उकल होणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – क्रिप्टो करन्सीच्या बहाण्याने गंडा घालणार्‍या एका टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीशी संबंधित तीन आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सुभानी मोहम्मद उमर खान, साहिल मुस्तफा कुरेशी आणि गुफान म्हणणार खान अशी या तिघांची नावे आहेत. यातील मोहम्मद सुभानी उत्तरप्रदेश, साहिल गुजरात तर गुफान मध्यप्रदेशच्या भोपाळचा रहिवाशी आहे. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुक करणारी ही आंतरराज्य टोळी असून त्यांच्या अटकेने अशाच फसवणुकीच्या काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हिमांशू बाबूलाल पामेचा हा १९ वर्षांचा तरुण चेंबूर येथे राहत असून कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा दिड वाजता त्याने त्याचा मित्र जयेश शर्माला फोन करुन क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगसाठी हवी असल्याचे सांगितले. यावेळी हर्षने त्याला एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यामुळे हिमांशूने त्या मोबाईलवर संपर्क साधून त्याच्याकडे करन्सीचे भाव काय आहे अशी विचारणा केली होती. यावेळी या व्यक्तीने एक करन्सीसाठी ८७ रुपयांचा भाव सुरु असल्याचे सांगितले. त्याने एकाच वेळेस दोन लाख रुपयांचे करन्सी घेतल्यास त्याला स्वस्तात करन्सी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यास हिमांशू याने होकार देत त्याच्याकडे दोन लाखांच्या क्रिप्टो करन्सीची मागणी केली होती. त्यानंतर या व्यक्तीने त्याला जोगेश्‍वरीतील एस. व्ही रोड, मॅकडोनाल्ड कॅफेजवळ बोलाविले होते.

ठरल्याप्रमाणे हिमांशू तिथे गेला होता. काही वेळानंतर तिथे एक तरुण आला. त्याने त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले, क्रिप्टो करन्सी आणून देतो असे सांगून तो निघून गेला आणि परत आलाच नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच हिमांशूने आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांनी गंभीर दखल गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप फुंदे, पोलीस हवालदार गोरखनाथ पवार, प्रदीप कुलट, शिल्पेश कदम, पोलीस शिपाई सचिन साखरे आणि योगेश नरळे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीच्या मोबाईलसह तांत्रिक माहितीवरुन या पथकाने मोहम्मद सुभानी खान, साहिल कुरेशी आणि गुफान खान या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

यातील मोहम्मद सुभानी हा उत्तरप्रदेशच्या आंबेडकरनगर, आश्रफुर किछोच्छा, साहिल हा गुजरातच्या अहमदाबाद, अलिफनगर सोनल फॅक्टरी, तर गुफान हा मध्यप्रदेशच्या भोपाळ, शहाजानबादचा रहिवाशी आहे. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. क्रिप्टो करन्सीच्या नावाने गंडा घालणारी ही सराईत टोळी असल्याचे बोलले जाते. या तिन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे. त्यांच्याविरुद्ध इतर काही गुन्हे दाखल आहेत का, अशाच प्रकारे त्यांनी इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page