एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह विधानानंतर शिवसैनिकांचा राडा
कुणाल कामरासह हॉटेलची तोडफोड करणार्या शिवसैनिकांवर गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2025
मुंबई, – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण असून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रविवारी खार येथील युनिकॉन्टीनेन्टल हॉटेलसमोर जोरदार घोषणाबाजी करुन हॉटेलची तोडफोड केली होती. याप्रकरणी तेरा शिवसैनिकांना खार पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने या सर्व शिवसैनिकांची जामिनावर सुटका केली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. याच प्रकरणात सोमवारी दिवसभरात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.
कुणाल कामरा हा स्टॅण्डअप कॉमेडियन असून त्याने अलीकडेच एका कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली. नंतर ते सर्वजण एकत्र आले. एका मतदाराला नऊ बटण दिले. सर्व काही कन्फ्युज करुन टाकले, सुरुवातीला एकाने केली आणि ती सुरुवात ठाण्यातून झाली असे सांगून त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री खार येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलसमोर घोषणाबाजी केली. या शिवसैनिकांनी स्टॅण्डअप कॉमेडी शो पाडला. हॉटेलच्या कर्मचार्यांना धक्काबुक्की करुन शिवसैनिकांनी हॉटेलची तोडफोड केली.
अचानक झालेल्या घोषणाबाजी आणि तोडफोडीमुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते. ही माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणार्या शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. काही वेळात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र शिवसैनिकांच्या तोडफोडीमुळे हॉटेलचे प्रचंड नुकसान झाले होते. परिस्थिती चिघडू नये म्हणून पोलिसांनी तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक विजय सैद यांनी राहुल कनान, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर, गोविंद ऊर्फ पेंडी, राहुल तुरबाडकर, विलास चाक्री, आमीन शेख, समीर महापदी, हिमांशू शंशाक कोदे, संदीप मालप, गणेश राणे, पाटील, शोभा पालवे, कृष्णा ठाकूर, पवनज्योत सेठी, कल्पेश, चाँद शेख, कुरेशी हुजके यांच्यासह इतर पंधरा ते वीस शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर राहुल कनानसह अकराजणांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या सर्वांना सोमवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. याच गुन्ह्यांत कुणाल कामरा याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.