मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2025
मुुंबई, – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानानंतर चार गुन्ह्यांची नोंद झालेल्या स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराप्रकरणी कार्यक्रमांत सहभागी झालेल्या प्रेक्षकांची चौकशी झाली नाही. कोणालाही पोलिसांकडून समन्स पाठवून चौकशीसाठी बोलाविण्यात आले नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्यानंतर कुणाल कामराविरुद्ध खार पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याच गुन्ह्यांत चौकशीसाठी हजर राहण्याचे कुणालला समन्स बजाविण्यात आले होते. मात्र तो मुंबईबाहेर असल्याने चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. त्याने चौकशीसाठी काही दिवसांची मुदत मागून घेतली होती, मात्र त्याची मागणी पोलिसांनी फेटाळून लावली होती. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांची पोलिसांनी जबानी घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात होते. त्यासाठी काही प्रेक्षकांना समन्स पाठविण्यात आले होते.
या समन्सनंतर काही प्रेक्षक खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली होती. त्यांच्याकडून कार्यक्रमांत झालेल्या प्रत्येक गोष्टींची माहिती जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता. कार्यक्रमांचे चित्रीकरण लाईव्ह होते का, त्यांना तिथे कोणी बोलाविले होते असे वृत्त आले होते. मात्र या वृत्ताचे पोलिसांकडून खंडन करण्यात आले आहे. अशा प्रकारे कार्यक्रमांत सहभागी झालेल्या कुठल्याही प्रेक्षकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले नाही किंवा त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले नसल्याचे सांगण्यात आले.