स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद
एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी वादाच्या भोवर्यात सापडलेल्या स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध अन्य तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या गुन्ह्यांचा तपास खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. कुणालविरुद्ध यापूर्वीच खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला चोकशीसाठी हजर राहण्याचे दोनदा समन्स बजाविण्यात आले होते. शिंदे यांच्यावर गद्दार अशी टिका केल्यामुळे शिवसैनिकांनी अलीकडेच खार येथील युनिकॉन्टीनेन्टल हॉटेलसमोर जोरदार घोषणाबाजी करुन हॉटेलची तोडफोड केली होती.
कुणाल कामरा हा स्टॅण्डअप कॉमेडियन असून त्याने अलीकडेच एका कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली. नंतर ते सर्वजण एकत्र आले. एका मतदाराला नऊ बटण दिले. सर्व काही कन्फ्युज करुन टाकले, सुरुवातीला एकाने केली आणि ती सुरुवात ठाण्यातून झाली असे सांगून त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री खार येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलसमोर घोषणाबाजी केली. या शिवसैनिकांनी स्टॅण्डअप कॉमेडी शो पाडला.
हॉटेलच्या कर्मचार्यांना धक्काबुक्की करुन शिवसैनिकांनी हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी खार पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली होती. तोडफोड करणार्या शिवसैनिकांना अटक करुन लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले होते. मात्र कुणाल चौकशीसाठी हजर झाला नाही. याच दरम्यान त्याने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी कोर्टाने त्याला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामिन दिला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असतानाच जळगावच्या बुलढाण्याचे संजय दिगंबर बोरसे, नांदगावचे सुनिल शंकर जाधव आणि नाशिक ग्रामीणचे मयुर कारभारी बोरसे यांनी कुणाल कामराविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करुन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. कामरा याने एकनाथ शिंदे यांची बदनामी केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याविरोधात अपमानास्पद विधाने करुन दोन्ही राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
या तक्रारीनंतर कुणाल कामराविरुद्ध संबंधित पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली होती. हा गुन्हा मुंबईत घडल्याने त्याचा तपास खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा खार पोलिसांकडून तपास सुरु आहे. या आधीच्या गुन्ह्यांत त्याला अंतरिम अटकपूर्व जामिन मिळाला असला तरी त्याला नव्या गुन्ह्यांत चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.