हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
मद्यप्राशन करताना क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस कुरार पोलिसांनी अटक केली. बाबू दत्तू गायकवाड असे या आरोपीचे असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मद्यप्राशन करताना क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून बाबूने कृष्णा वर्मा या व्यक्तीवर तिक्ष्ण हत्याराने वार करुन पलायन केले होते. याप्रकणी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
एकनाथ शिवाजी पाटील हे मुलुंड ेथे राहत असून कुरार पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. 24 एप्रिलला रात्री उशिरा ते परिसरात गस्त घालत होते. यावेळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून मालाडच्या कुरारगाव, आप्पापाडा, सायमन चिलो देशी बारसमोर एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असून त्याला पोलीस मदतीची गरज आहे असा कॉल आला. त्यामुळे ते घटनास्थळी रवाना झाले होते. तिथे त्यांना एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिसून आले. त्याच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे त्याला तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकणी एकनाथ पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हल्ल्यानंतर पळून गेलेल्या मारेकर्याचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना रविवारी बाबू गायकवाड या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच जखमी व्यक्तीवर हल्ला केल्याची कबुली दिली. जखमी व्यक्तीचे नाव कृष्णा वर्मा असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. सध्या तो मालाड परिसरात राहतो. गुरुवारी 24 एप्रिलला तो सायमन चिलो देशी बारमध्ये मद्यप्राशन करत होता. तिथेच त्याचे बाबूसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर या दोघांनाही तेथील कर्मचार्यांनी बारबाहेर काढले होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. याच वादानंतर बाबूने कृष्णावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर तो पळून गेला होता. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्याला रविवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी सांगितले.