तलावातील खेकडे पकडणे पिता-पूत्रांच्या जिवावर बेतले
12 वर्षांच्या मुलाला वाचविताना पित्याचाही पाण्यात बुडून मृत्यू
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑगस्ट 2025
मुंबई, – तलावात खेकडे पकडताना पाण्यात बुडणार्या वाचविताना पित्याचाही दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. एकनाथ मारुती पाटील आणि वैष्णव एकनाथ पाटील अशी या पिता-पूत्रांची नावे आहेत. शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने क्रांतीनगर परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती. याप्रकरणी कुरार पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. या घटनेमागे घातपात नसून अपघातच असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांनी सांगितले.
ही घटना शनिवारी 9 ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता कांदिवलीतील रामगड बाईसर नाला, हरिची बावडी तलावात घडली. 50 वर्षाचे एकनाथ पाटील हे त्यांचा बारा वर्षांचा मुलगा वैष्णव याच्यासोबत कांदिवलीतील क्रांतीनगर, जय बजरंग चाळीत राहतात. शनिवारी दुपारी त्यांचा मुलगा वैष्णव हा हरिची बावडी तलावात खेकडे पकडण्यासाठी गेला होता. खेकडे पकडताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. हा प्रकार त्याचे वडिल एकनाथ पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुलाला वाचचिण्यासाठी तलावात उडी घेतली होती.
मात्र त्यांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे या दोन्ही पिता-पूत्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्यासह कुरार पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी अग्निशमन दलाने पाण्यातून दोघांनाही बाहेर काढून कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे या दोन्ही पिता-पूत्राला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोघांचेही मृतदेह नंतर शवविच्छेनासाठी पाठविण्यातआले होते.
पाटील कुटुंबियांच्या नातेवाईकांचा नंतर शोध घेण्यात आला. त्यांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली आहे. त्यांच्या जबानीतून त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. त्यामुळे ही जबानी नोंदवून पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.