४२ वर्षांच्या महिलेवर दोन तरुणांकडून प्राणघातक हल्ला
अश्लील कमेंटचा जाब विचारला म्हणून हल्ला केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मालाड येथे राहणार्या राणी पर्वतसिंग चौहाण या ४२ वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून दोन तरुणांनी चाकूने वार करुन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राणी ही गंभीररीत्या जखमी झाल्याने तिला उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही हल्लेखोरांना कुरार पोलिसांनी अटक केली. सागर महेश शिंदे आणि कमलेश अनंत जाधव अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
राणी ही मालाडच्या पठाणवाडी, शिवाजीनगरच्या सर्जू यादव चाळीत राहते. याच परिसरात सागर शिंदे आणि कमलेश जाधव हे राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. ते दोघेही रस्त्यावरुन येता-जाता तिला पाहून अश्लील कमेंट पास करत होते. याच कारणावरुन तिचे या दोघांशी वाद झाला होता. त्याचा त्यांच्या मनात राग होता. सोमवारी सायंकाळी सव्वाचार वाजता राणी ही महिला तिच्या मुलीसोबत घरात होती. यावेळी तिथे सागर आणि कमलेश हे दोघेही आले. त्यांनी तिच्या घरात घुसून जुना वाद काढून तिच्याशी भांडण सुरु केले होते. तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने स्वतला वाचविण्याचा प्रयत्न केला, तरीही चाकू हल्ल्यात तिच्या छातीला आणि पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर त्यांनी राणीसह तिच्या मुलीला लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले होते. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
चाकू हल्ल्यात राणी ही गंभीररीत्या जखमी झाल्याने तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या तकारीनंतर पोलिसांनी सागर शिंदे आणि कमलेश जाधव यांच्याविरुद्ध १०९ (१), ३३३, ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही हल्लेखोरांना मालाड येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.