मुलाला दागिने चोरी करण्यास प्रवृत्त केल्याप्रकणी तरुणीला अटक
दोन महिन्यांत सव्वापाच लाखांचे दागिने घेऊन तीन हजार दिले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑगस्ट 2025
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरी करण्यास प्रवृत्त करुन सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीला कुरार पोलिसांनी अटक केली. लक्ष्मी रामदास विश्वकर्मा असे या आरोपी तरुणीचे नाव असून याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्या दोन महिन्यांत तिने अल्पवयीन मुलाकडून सुमारे सव्वापाच लाख रुपयांचे दागिने घेतले असून त्यामोबदल्यात त्याला तीन हजार रुपये दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तिच्याकडून लवकरच सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
39 वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील कुरार गाव परिसरात राहत असून इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतात. त्यांच्या घरी एक इलेक्ट्रीक बोडै असून त्यात त्यांनी काही वस्तू ठेवण्यासाठी जागा बनविली होती. या जागेत त्यांनी त्यांचे घरातील सोन्याचे दागिने ठेवले होते. शुक्रवारी 1 ऑगस्टला त्यांना तो बोर्ड उचकलेला दिसला. त्यामुळे त्यांनी आतील दागिन्यांची पाहणी केली असता तिथे सुमारे सव्वापाच पाच रुपयांचे विविध सोन्याचे दागिने नव्हते. याबाबत त्यांनी त्यांच्या पत्नीसह चौदा वर्षांच्या मुलाकडे विचारणा केली होती, मात्र पत्ेेनीला दागिन्याविषयी काहीच माहिती नव्हती तर मुलगा दागिन्यांचा विषय निघताच घाबरलेला दिसून आला. त्यामुळे त्यांनी त्याला पोलिसांची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने बोर्डमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेतल्याचे तसेच ते दागिने लक्ष्मी विश्वकर्माला दिल्याचे सांगितले.
21 जुलैला त्याने पहिल्यांदा दागिन्यांचा बॉक्स काढून एक सोन्याचे पेंडट काएून लक्ष्मीला दिले होते. ते पेंडट त्याला रस्त्यावर सापडल्याचे सांगून ते विकून देण्याची विनंती केली होती. त्यामुळे तिने ते पेंडट विकून त्याला तीन हजार रुपये दिले होते. याच दरम्यान लक्ष्मी ही त्याच्याकडे आली होती. तिने त्याला घरातील सर्व दागिने आणून दे, त्याचे त्याला चांगले पैसे देते असे सांगितले. पैशांच्या आमिषाला बळी पडून त्याने 21 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत घरातील सुमारे सव्वापाच लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने काढून लक्ष्मीला दिले होते. अशा प्रकारे लक्ष्मीने तक्रारदाराच्या मुलाला त्याच्याच घरी चोरी करण्यास प्रवृत्त करुन त्याच्याकडून घेतलेल्या सोन्याचा दागिन्यांचा अपहार केला होता.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून लक्ष्मी विश्वकर्मा हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल करुन रविवारी लक्ष्मी विश्वकर्मा हिला अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून सर्व सोन्याचे दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.