झारखंडच्या कोळसा व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

एक कोटीवर दोन कोटीचे कोळसा देण्याची बतावणी करुन घातला गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सुमारे 96 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी झारखंडच्या एका कोळसा व्यावसायिकाविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजीवकुमार सिंग असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केल्याचे बोलले जाते. एक कोटीवर दोन कोटीचे कोळसा देण्याची बतावणी करुन त्याने मालाडच्या एका रियल इस्टेटसह हॉटेल व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांचा तपासकामी कुरार पोलिसांची एक टिम लवकरच झारखंड येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रियल इस्टेट व्यावसायिक असलेले रमनदिपसिंग गुरुविंदरसिंग कोहली हे मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहतात. रियल इस्टेटप्रमाणे त्यांचा हॉटेलचा व्ववसाय आहे. त्यांचा सुशांता जॉयदेव बिस्वास हा मित्र असून ते एकमेकांना गेल्या दहा वर्षांपासून ओळखतात. त्यांच्यामार्फत त्यांची संजीवकुमार सिंगशी ओळख झाली होती. झारखंडच्या धनबाद परिसरात त्याची कोळसाची खाण आहे. कोणालाही कोळसा हवा असल्याने तो त्यांना स्वस्तात कोळसा देईल असे सांगितले. त्यांच्यासह इतर हॉटेल व्यावसायिकांना कोळसा लागत असल्याने त्यांनी त्याच्याकडून एक कोटीचा कोळसा घेण्याचे ठरविले होते.

सप्टेंबर 2025 रोजी संजीवकुमार हा मुंबईत आला होता. यावेळी त्यांच्यात कोळसा खरेदीबाबत एक मिटींग झाली होती. यावेळी संजीवने त्यांना एक कोटीचे पेमेंट दिल्यास त्यांना दोन कोटीचे कोळसा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्याला पाच लाख रुपयांचे आगाऊ पेमेंट दिले होते. नोव्हेंबर 2025 सुशांता आणि रमनदिपसिंग हे दोघेही झारखंड येथे गेले होते. तिथे त्यांना संजीवकुमार भेटला. त्यानंतर ते तिघेही कोळसाच्या खाणीजवळ गेले होते. तेथून काही डंपर भरुन कोळसा बाहेर काढला जात होता. हा संपूर्ण माल त्यांचा असून तो मुंबईत पाठविण्यात येणार आहे असे संजीवकुमारने सांगितले.

त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी 50 लाख रुपये मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, 40 लाख भव्य ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड इम्पोर्ट, एक लाख रुपये फोनपे तसेच पाच लाख रुपये कॅश स्वरुपात असे 96 लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्याने त्यांना बिल देण्याचे देतो असे सांगून तिथे थांबवून घेतले. मात्र त्याने त्यांना बिल दिले नाही. वारंवार विचारणा करुनही तो बिल देत नव्हता. हा व्यवहार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे दिले नाही किंवा कोळसाची डिलीव्हरी पाठविली नाही.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संजीवकुमार सिंग याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कोळसासाठी घेतलेल्या सुमारे 96 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. संजीवकुमार हा झारखंडचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page