मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – दोन्ही पायांनी अपंग असलेल्या चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करुन शेजारी राहणार्या २३ वर्षांच्या तरुणाने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच विकास नावाच्या आरोपी तरुणाला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने पिडीत मुलगी प्रचंड घाबरल्याने तिने त्याची कुठेही वाच्यता केली नव्हती. नंतर तिने तिच्या आईला ही माहिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
३२ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली परिसरात राहत असून घरकाम करते. तिला चौदा वर्षांची एक मुलगी असून ती दोन्ही पायांनी अपंग आहे. त्यामुळे ती घरातच राहत असून बाहेर जात नाही. तिच्याच शेजारी आरोपी तरुण राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. सोमवारी सकाळी तक्रारदार महिला आणि तिचे पती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. यावेळी त्यांच्या घरी त्यांची मुलगी एकटीच होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपी त्यांच्या घरी आला. त्याने या मुलीशी जवळीक साधून तिच्या अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिला मिठी मारुन तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तो पळून गेला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती, त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. तिच्या वागण्यात अचानक झालेला बदल तिच्या आईच्या लक्षात आला होता. त्यामुळे तिने तिची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ७४, ३३३ भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी कांदिवली येथून अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.