लग्नासाठी तरुणीचा पाठलाग करुन बदनामीचा प्रयत्न

22 वर्षांच्या माजी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – लग्नासाठी एका तरुणीचा पाठलाग करुन तिला लग्न केले नाहीतर कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तिच्या बदनामीचा प्रयत्न माजी प्रियकराने केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोहम्मद जुनैद इजहार खान या माजी प्रियकराविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तक्रारदार तरुणीचे आरोपीसोबत प्रेमसंंबंध होते, मात्र कौटुंबिक कारणावरुन तिने त्याच्याशी संबंध तोडून टाकले होते, तेव्हापासून तो तिचा मानसिक शोषण करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

23 वर्षांची तक्रारदार तरुणी मालाड परिसरात तिच्या आई, वडिल, बहिण भावांसोबत राहते. सध्या ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मिडीयावर जुनैदशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यानंतर ते दोघेही सोशल मिडीयावरुन एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. एप्रिल 2025 रोजी तो ईदच्या दिवशी तिला भेटण्यासाठी मालाड येथे आला होता. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना नियमित भेटत होते. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते. तिनेही त्याला होकार दिला होता.

मात्र कौटुंबिक कारणावरुन त्यांचे लग्न होणार नसल्याने तिने नंतर त्याला लग्नासाठी नकार दिला होता. त्यानंतर तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते. त्यांच्यात संभाषण झाले नव्हते. 5 जानेवारी 2026 रोजी तिचा साखरपुडा झाला होता. ही माहिती नंतर जुनैदला समजली होती. त्यानंतर तो तिचा सतत पाठलाग करत होता. त्याने तिच्या वडिलांसह चुलत्याची भेट घेऊन तिचे लग्न मोडून त्याच्याशी लग्न करण्याची परवानगी मागितली होती. यावेळी त्यांनी त्याला नकार देत त्याच्यासोबत त्यांच्या मुलीचे लग्न होणार नाही असे सांगितले. तरीही तो तिचा सतत पाठलाग करत होता.

यावेळी तिने त्याची समजूत काढून त्यांच्यातील संबंध संपल्याचे सांगून त्याला तिचा पाठलाग करु नकोस अशी विनंती केली होती. यावेळी त्याने तिला त्याच्याशी लग्न केले नाहीतर तो कोणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली होती. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. वारंवार समजूत घालूनही त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तरीही तो तिचा पाठलाग करुन तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. अलीकडेच त्याने तिची तिच्याच नातेवाईकांकडे बदनामी सुरु केली होती.

हा प्रकार नातेवाईकांकडून समजताच तिने जुनैदविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी ती तिच्या पालकांसोबत कुरार पोलीस ठाण्यात गेली आणि तिने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून जुनैदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रारदार तरुणीचा पाठलाग करणे, तिची बदनामी करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page