मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2025
मुंबई, – गुढीपाडव्यावर भगवे झेंडे घेऊन जाणार्या राजकुमार शंभुनाथ चौबे या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोघांना कुरार पोलिसांनी अटक केली. अशीन सिराज शेख आणि मोहम्मद वसीम सलीम जोहड अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर आठ ते नऊ आरोपींचे नाव समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
राजकुमार हा मोबाईल रिपेरिंगचे काम करत असून तो साकिनाका परिसरात राहतो. रविवारी गुढीपाडवा असल्याने तो मालाडच्या कुरार व्हिलेज, पठाणवाडीत पालखीसह मिरवणुकीत सामिल होण्यासाठी ाअला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मेहुणा अंकित चौबे, मित्र सुजीत पाल, आदित्य क्षीरसागर, कुनाल शर्मा, विवेक तिवारी, गणेश मौर्या, निखील चौहाण आणि ऋषी मिश्रा आठजण होते. या सर्वांच्या हातात भगवे झेंडे होते. मिरवणुकीच्या दिशेने जाताना राणी सती मार्ग, नुराणी मशिदीजवळ एका गटाने या सर्वांना अडवून त्यांच्याशी विनाकारण वाद घातला होता.
बेकायदेशीरपणे जमाव जमवून राजकुमार चौबेसह इतर तरुणांना बेदम मारहाण केली होती. त्यांच्यावर या आरोपींनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात राजकुमारला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या घटनेनंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत करणे, दंगल घडवून तणावाचे वातावरण निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना अशीन शेख आणि मोहम्म वसीम या दोघांना सोमवारी रात्री उशिरा मालाड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आठ ते नऊ आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे.