पर्समधून पैसे चोरी करते म्हणून मारहाण करुन चटके दिले
अकरा वर्षांच्या मुलीला चटके देणार्या मातेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 एपिल 2025
मुंबई, – पर्समधून चोरी करते म्हणून एका महिलेने तिच्या अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करुन तिला गरम चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी 37 वर्षांच्या मुलीच्या आईविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनिता दत्तात्रय चंदनशिवे ही महिला नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहते. सध्या ती चेंबूरच्या महिला बाल विकास संरक्षण विभागात कामाला आहे. त्यांचा एक हेल्पलाईन क्रमांक असून या क्रमांकावर मदतीचा कॉल आल्यानंतर संबंधित पथक संकटात असलेल्या अल्पवयीन मुलांच्या मदतीसाठी जातात. त्यांचे म्हणणे ऐकून दोषी व्यक्तीविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करतात. गुरुवारी 10 एप्रिलला दुपारी एक वाजता त्यांच्या हेल्पलाईन एक कॉल आला होता. त्यात मालाडच्या कुरारगावात राहणार्या एका महिलेने तिच्या अकरा वर्षांच्या मुलीला मारहाण करुन तिच्या शरीरावर चटके दिल्याची माहिती सांगण्यात आली होती.
या माहितीनंतर अनिता चंदनशिवे ही तिच्या सहकार्यासह कुरार पोलिसांसोबत घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना आरोपी महिला तिच्या अकरा वर्ष दहा महिन्याचे वय असलेल्या मुलीसोबत राहते. तिने तिच्या मुलीला चपाती उलथण्याच्या चमच्याने मारहाण तसेच उलथनी गरम करुन तिच्या उजव्या गालाला, दोन्ही मांडीवर, हातावर गरम चटके दिल्याचे सांगितले. तिची मुलगी तिच्या पर्समधून सतत पैसे काढत होती. तिला पैसे काढू नकोस बोलूनही ती पर्समधून पैशांची चोरी करत होती. गुरुवारी तिने पुन्हा तिच्या पर्समधून पैशांची चोरी केली होती. त्याचा राग आल्याने तिने तिच्या मुलीला मारहाण केली होती. त्यानंतर तिला कायमचा धडा शिकवण्यासाठी तिच्या शरीरावर गरम चटके दिले होते.
तपासात आलेल्या या माहितीनंतर अनिता चंदनशिवे हिने आरोपी आईविरुद्ध कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर 37 वर्षांच्या आरोपी महिलेविरुद्ध भारतीय न्यास सहिता आणि अल्पवयीन न्याय अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत तिला नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. स्वतच्या मुलीला मारहाण करुन तिला गरम चटके दिल्याचा प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.