भांडणात मध्यस्थी करणार्‍या तरुणीवर दगडाने हल्ला

हल्ल्यानंतर पळून गेलेल्या तिन्ही हल्लेखोरांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जून 2025
मुंबई, – भांडणात मध्यस्थी करणार्‍या एका 18 वर्षांच्या तरुणीवर तीनजणांच्या टोळीने दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली. या हल्ल्यात संध्या दिनेश भारद्वाज ही तरुणी जखमी झाल्याने तिच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करण्यात आले होते. याप्रकरणी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही हल्लेखोरांना कुरार पोलिसांनी अटक केली. राहुल पन्नेलाल पासवान ऊर्फ संदीप पास्टे, शैलेश पन्नालाल पासवान ऊर्फ बाबू पास्टे आणि शिवकुमार ओमप्रकाश मिश्रा अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संध्या ही तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज, शिवशक्ती चाळीत राहते. सध्या ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. याच परिसरात आरोपी राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. 31 मे 2025 रोजी रात्री बारा वाजता तिचा भाऊ राहुल भारद्वाज, त्याचा मित्र अनिकेत यांच्याशी आरोपी वाद घालत होते. हा प्रकार निदर्शनास येताच तिने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी या तिन्ही आरोपींनी राहुल व अनिकेतला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे तिने आरोपींना भांडण करु नका असे सांगून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती.

मात्र मध्यस्थी केली म्हणून त्यांनी तिलाच बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बाबूने तिच्यावर दगडाने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्राव सुरु झाल्याने ती जागीच कोसळली होती. या घटनेनंतर तिन्ही आरोपी तेथून पळून गेले होते. जखमी झालेल्या संध्याला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते.

उपचारानंतर तिने घडलेला प्रकार कुरार पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या राहुल पासवान, शैलेश पासवान आणि शिवकुमार मिश्रा या तिघांनाही नंतर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page