दिवसा रेकी करुन रात्री रिक्षा चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चोरीच्या सात रिक्षासह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जुलै 2025
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्री उशिरा रिक्षा चोरी करुन चोरीच्या रिक्षाचे सुट्टे भाग विक्री करणार्‍या एका टोळीचा कुरार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मुस्लिम ताहीर अन्सारी आणि निसार इदु अहमद अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चोरीच्या सात रिक्षा जप्त केल्या आहेत. या सर्व रिक्षा त्यांनी कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अशोककुमार हिरालाल यादव हा मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहत असून रिक्षाचालक आहे. 14 जूनला त्याने त्याची रिक्षा कुरारगाव, पालनगर परिसरात पार्क केली होती. त्यानंतर तो त्याच्या घरी निघून गेला होता. दुसर्‍या दिवशी तो तिथे आला होता, यावेळी त्याला त्याची रिक्षा दिसली नाही. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने रिक्षा चोरी केल्याचे लक्षात येताच त्याने कुरार पोलिसांत रिक्षा चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती.

गेल्या काही महिन्यांत मालाड परिसरातून रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे, पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय घोळवे, पोलीस हवालदार तानाजी मोरे, समरेश भोगले, सागर पवार, पोलीस शिपाई बबन राठोड, संतोष फडतरे, श्रीकांत गोरे यांनी तपास सुरु केली होती.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी निसार याला संशयित आरोपी म्हणून काम ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच दिवसा रेकी करुन परिसरात पार्क केलेल्या काही रिक्षांची चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या रिक्षा तो मॅकनिक मोहम्मद मुस्लिमला देत होता. तो रिक्षाचे सुट्टे भाग करुन त्याची बाजारात विक्री करत होता. काही रिक्षाचे भाग करुन ते दुसर्‍या रिक्षांना लावून दुसर्‍या क्रमांकावर रिक्षा चालविण्यासाठी देत होता. या दोघांनी आतापर्यंत सातहून अधिक रिक्षांची चोरी केल्याची कबुली दिली असून या सातही रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहे.

दोन्ही आरोपी मालाडचे रहिवाशी आहे. निसार हा रिक्षा चोरी करत होता तर मोहम्मद मुस्लिम रिक्षांचे सर्व सुट्टे भाग वेगळे करत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांकडून रिक्षा चोरीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page