साई मंदिरात चोरी करणार्‍या दोन आरोपींना अटक

मध्यरात्री मंदिरात प्रवेश करुन चोरी केल्याची कबुली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जानेवारी 2026
मुंबई, – मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात असलेल्या साई मंदिरात चोरी करुन पळून गेलेल्या दोन आरोपींना कुरार पोलिसांनी अटक केली. अली ऊर्फ लंगडा सैन्नूर खान आणि प्रशांत ऊर्फ परश्या पांडुरंग चोरट अशी या दोघांची नावे आहेत. मध्यरात्री मंदिरातील मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश करुन दानपेटीतील कॅश चोरी केल्याची या दोघांनी कबुली दिली आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

प्रशांत नारायण पेंडुरकर हे मालाडच्या कुरार गाव, कोकणीपाड्यातील देवळा चौधरी चाळीत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. याच परिसरातील बानडोंगरी, नालंदा अपार्टमेंटमध्ये साई मंदिर ट्रस्ट असून या ट्रस्टमध्ये ते उपसेक्रेटरी म्हणून काम करतात. या ट्रस्टच्या मालकीचे एक साई मंदिर असून ते मंदिर पहाटे साडेचार ते रात्री साडेदहा वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले असते. मंदिरात स्टिल दानपेटी ठेवण्यात आली असून त्यात भक्त त्यांच्या इच्छेने दान रक्कम टाकतात. दर महिन्यांच्या पहिल्या रविवारी दानपेटी उघडली जाते, महिन्याभरात दानपेटीत अंदाजे पन्नास हजार रुपये जमा होते.

27 डिसेंबरला मंदिरातील कर्मचारी रमाकांत पालेकर हे मंदिर उघडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना मंदिराचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले आणि आतील दानपेटी फोडून अज्ञात व्यक्तीने आतील पैसे चोरी केल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांसह भाविकांनी तिथे धाव घेतली होती. या घटनेनंतर त्यांनी मंदिरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात रात्री सव्वातीन वाजता मंदिरात दोन तरुणांनी प्रवेश करुन ही चोरी केल्याचे दिसून आले होते.

या प्रकारानंतर प्रशांत पेंडुरकर यांनी कुरार पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेने स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कुरार पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी मंदिरासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अली खान आणि प्रशांत चोरट या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page