कुरार पोलीस ठाण्याच्या लाचखोर पोलिसांवर बडतर्फीची कारवाई
लाचेची मागणी करुन लाच घेणे चांगलेच महागात पडले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – कुरार पोलीस ठाण्याच्या लाचखोर पोलीस अधिकार्यांवर अखेर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव बळीराम तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोविंदराव जुने यांचा समावेश आहे. लाचेची मागणी करुन लाच घेणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे. दरम्यान या दोन्ही अधिकार्यांवर थेट बडतर्फीची कारवाई झाल्याने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मालाड परिसरात राहणार्या एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह लैगिंक अत्याचाराची तक्रार आली होती. या दोन्ही तक्रारीनंतर त्याचा तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुने यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यांत त्यांना मदत करण्यासाठी तसेच दोन्ही प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ज्ञानेश्वर जुने यांनी संजीव तावडे यांच्यासह स्वतसाठी तीन लाखांची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी दोन लाखांची लाचेची रक्कम त्याने तक्रारदाराकडून घेतली होती. उर्वरित एक लाखांच्या रक्कमेसाठी ते त्यांना सतत कॉल करत होते. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्यावर कारवाईची धमकी देत होते.
लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 22 जानेवारीला संजीव तावडे आणि ज्ञानेश्वर जुने यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 18 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुरार पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून लाचेचा एक लाखांचा दुसरा हप्ता घेताना ज्ञानेश्वर जुने यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत संजीव तावडे यांचा सहभाग उघडकीस आला होता, त्यामुळे त्यांनाही नंतर या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. या कारवाईनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. आता त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई झाली आहे.
यापूर्वी सप्टेंबर 2025 रोजी वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे यांना तर मे 2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव मधुकर देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी लाचेच्या गुन्ह्यांत अटक केली होती. या कारवाईनंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली होती. आता संजीव तावडे आणि ज्ञानेश्वर जुने यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.