मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – मालाड परिसरात असलेल्या रिद्धी-सिद्धी या मिठाईच्या अर्धवट उघडा राहिलेल्या दुकानात प्रवेश करुन कॅश ड्रॉव्हरमधील कॅशसहीत कामगाराचे नऊ मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या एका टोळीचा कुरार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीच्या मोबाईलसह कॅश जप्त केली आहे. रिहान अख्तर शेख, अक्षान ऊर्फ सनी बेचन सिंग आणि अविनाश मनोज शर्मा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही नालासोपारा व मालाडचे रहिवाशी आहे. याच गुन्ह्यांत तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हंसराज नेनाराम चौधरी हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचा गोरेगाव येथील फिल्मसिटी रोड, वाघेश्वरी मंदिरसमोरच रिद्धी-सिद्धी स्विट्स नावाचे एक दुकान आहे. याच दुकानात 22 कामगार असून ते दिवसभर काम करुन रात्री दुकानाच्या पहिल्या मजल्यावर झोपतात. 5 ऑक्टोंबरला रात्री वाजता हंसराज चौधरी यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. साडेअकरा वाजता सर्व कामगार जेवण करुन झोपण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा त्यांच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन नऊ कामगाराचे मोबाईल आणि दुकानातील ड्राव्हरमधील 3 लाख 39 हजाराची कॅश असा 3 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार नंतर कामगाराच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती हंसराज चौधरी यांना दिली होती. त्यानंतर त्यांनी कुरार पोलिसांना घडलेला प्रकार अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे, पोलीस निरीक्षक नंदकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश नलावडे, पोलीस हवालदार सागर पवार, पोलीस शिपाई रमेश खांडवी, शंकर सोनावणे, गणेश सातपुते, महिला पोलीस शिपाई शिल्पा पाटील यांनी तपास सुर केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने मालाड परिसरातून रिहान शेख, अक्षान सिंग आणि अविनाश शर्मा या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली.
रात्रीच्या वेळेस फेरफटका मारताना त्यांना मिठाईचे दुकान अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी दुकानात प्रवेश केला होता. यावेळी काही कामगार तिथे झोपले होते. त्यामुळे त्यांनी नऊ कामगाराचे मोबाईल आणि कॅश ड्रॉव्हरमधील कॅश असा 3 लाख 39 हजारांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे सर्व मोबाईल आणि काही कॅश जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.