मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपरची ऍक्टिव्हा बाईकला धडक लागून झालेल्या मायलेकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. कविता कालूराम सिंगाडिया (३२) आणि प्रविण कालूराम सिंगाडिया (१२) अशी या मायलेकाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डंपरचालक रिझवान रेहमान फजलू रेहमान याला नंतर नेहरुनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
हा अपघात मंगळवारी सकाळी सव्वासात वाजता कुर्ला येथील एस. जी बर्वे मार्गावरील नेहरुनगर, महेश हॉटेलसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कालूराम बाबूराम सिंगाडिया हे इंदिरानगर, ठक्कर बाप्पा कॉलनीत राहत असून त्यांचा फुटवेअरचा व्यवसाय आहे. मृत कविता ही त्यांची पत्नी तर प्रविण हा मुलगा आहे. प्रविण हा केदारनाथ विद्या प्रसाधिनी हायस्कूलमध्ये सहावीत शिकत होता. मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता त्यांची पत्नी कविता ही नेहमीप्रमाणे प्रविणला शाळेत सोडण्यासाठी तिच्या ऍक्टिव्हा बाईकवरुन जात होती. सात वाजता महेश हॉटेलसमोर एका भरवेगात जाणार्या डंपरने त्यांच्या ऍक्टिव्हा बाईकला जोरात धडक दिली होती. या अपघातात कविता आणि प्रविण हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे या दोघांनाही तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुर होते. उपचारादरम्यान कविता आणि प्रविण या दोघांचा मृत्यू झाला.
ही माहिती मिळताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कालूराम सिंगाडिया यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालक रिझवान रेहमान याच्याविरुद्ध भरवेगात हलगर्जीपणाने डंपर चालवून एका महिलेसह तिच्या बारा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अपघातात मायलेकाच्या मृत्यूने ठक्कर बाप्पा कॉलनीतील इंदिरानगरामधील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.