मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० डिसेंबर २०२४
मुंबई, – कुर्ला येथे भरवेगात बस चालविताना ब्रेक फेल झाल्याने सातजणांच्या मृत्यूस तर चाळीसजणांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी बसचालक संजय मोरे याला कुर्ला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील स्थानिक न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या पोलीस तपासात संजय मोरे याला इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) चालविण्याचा अनुभव नव्हता. त्याने फक्त दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून दोषी व्यक्तीवर सक्त कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून संबंधित पोलिसांना देण्यात आले आहे.
सोमवारी रात्री पावणेदहा वाजता ३३२ क्रमांकाची कुर्ला-अंधेरीदरम्यान धावणार्या बेस्ट बसला भीषण अपघात झाला होता. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरुन जाणार्या तसेच पार्क केलेल्या अनेक वाहनांना धडक दिली होती. यावेळी बसने अनेकांना चिरडले होते. या अपघातात सातजणांचा मृत्यू झाला होता. त्यात आफरीन अब्दुल सलीम शाह, आनम मुज्जफर शेख, कनिस फातिमा गुलाम कादरी, शिवम बुधराज कश्यप, विजय गायकवाड, मोहम्मद फारुख मोहम्मद रौफ चौधरी आणि मोहम्मद इस्लाम मोहम्मद निजाम अन्सारी यांचा समावेश आहे. इतर ४० जण जखमी झाले होते. जखमीपैकी अठराजणांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले तर इतर २२ जखमींवर अद्याप भाभा, सायन, हबीब, कुर्ला नर्सिंग होम, कोहीनूर क्रिटीकेअर आणि सेव्हन हिलमध्ये उपचार सुरु आहेत. काही जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
जखमीमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे. संबंधित चारही पोलीस कर्मचारी तिथे बंदोबस्तावर हजर होते. या चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर चालक संजय मोरे हा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याला स्थानिक रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातप्रकरणी संजय मोरे याच्याविरुद्ध १०५, ११०, ११८, ११८ (२) भारतीय न्याय सहितासह वाहतूक कायदा कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवून नंतर त्याला अटक केली होती. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी कुर्ला येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने त्याच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. सुरेश मोरे याने बसचा शस्त्र म्हणून वापर केला का, प्रवाशांसह पादचार्यांचा जीव धोक्यात घालून गर्दीच्या ठिकाणी भरवेगात बस चालविण्याच्या मागे त्याचा काय उद्देश होता. त्याने बस चालविण्याचे प्रशिक्षण कधी आणि कुठे घेतले, अपघाताच्या वेळेस त्याने मद्यप्राशन किंवा ड्रग्ज सेवन केले होते, अपघातग्रस्त बसची परिवहन विभागाकडून तपासणी करणे बाकी आहे असे विविध मुद्दे उपस्थित करुन सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
मात्र मोरेच्या वतीने त्याचे वकिल समाधान सुलाने यांनी त्यास विरोध करुन त्याची न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. बसमधील तांत्रिक बिघाडातून हा अपघात असून सुनिलने जाणूनबुजून हा अपघात केला नाही असेही त्यांनी न्यायालयात सांगितले. बस चालविण्यासाठी देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून जबाबदारी घेणे आवश्यक होते. शॉर्टसर्किटमुळे अनेक बेस्ट वाहनांना आग लागल्याची घटना घडली आहे. तसेच सुनिलने योग्य प्रशिक्षण घेतले होते, तो नियमित बस चालवत होता असेही सांगितले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात संजय मोरे याने १ डिसेंबरपासून बेस्टची इलेक्ट्रीक बस चालविण्यास सुरुवात केली होती. त्यापूर्वी त्याने मिनी बस चालविल्या होत्या. ईव्ही चालविण्याचा त्याचा अनुभव नव्हता. त्याने फक्त दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे त्याला अंधेरी-कुर्लादरम्यान धावणार्या बस चालविण्याची परवानगी कोणी दिली याचाही पोलीस तपास करत आहेत. संजयने भरवेगात बस चालविण्याचा प्रयत्न केला, याच प्रयत्नात बसचा ब्रेक फेल झाला आणि हा भीषण अपघात झाला होता. त्याला ईव्ही चालविण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्याला बसवर नियंत्रण मिळवता आले नाही असे तपासात उघडकीस आले आहे. सुनिल हा मानसिकदृष्ट्या चांगला असून अपघाताच्या वेळेस त्याने मद्यप्राशन केले होते का याचा पोलीस तपास करत आहे. त्याची मेडीकल करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.