रिक्षा अपघातात जखमी झालेल्या वयोवृद्धाचा मृत्यू

कुर्ला येथील घटना; आरोपी रिक्षाचालकास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2025
मुंबई, – रिक्षा अपघातात जखमी झालेल्या परशुराम महादेव पाटील या 81 वर्षांच्या वयोवृद्धाचा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी रिक्षाचालक विरेंद्रप्रताप विधीनारायण सिंग याला अटक केली होती. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. अपघातानंतर विरेंद्रप्रताप सिंग हा पळून गेला नाही. त्यानेच परशुराम यांना सिटीसह इतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा अपघात 26 मार्चला सकाळी सव्वादहा वाजता कुर्ला येथील एलबीएस मार्ग, शितल तलावाजवळ झाला होता. दर्शना परशुराम पाटील ही महिला कुर्ला येथील पाईप रोड, मारवाडी चाळीत राहते. ती एका आयुवैदिक मेडिकलमध्ये कामाला असून मृत परशुराम तिचे वडिल आहेत. ते डीटीटी कुरीअरमध्ये कामाला असून ते सकाळी साडेनऊ वाजता कामावर जातात आणि रात्री दहा वाजता घरी येतात. 26 मार्चला ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता कामासाठी निघून गेले होते.

सकाळी साडेदहा वाजता ते शितला तलावाजवळून जात होते. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका रिक्षाने त्यांना धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या कुर्ला येथील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करुन त्यांना भाभा व नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना 28 मार्चला पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दर्शना पाटील हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक विरेंद्रप्रताप सिंग याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने रिक्षा चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page