मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2026
मुंबई, – बेस्ट बसची धडक लागून झालेल्या अपघातात त्रिविक्रम आचार्य या 55 वर्षांच्या पुजार्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी कुर्ला परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी बसचालक कमलेशकुमार बरणवाल याच्याविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून नंतर त्याला अटक केली. हा गुन्हा जामित्रपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वाबारा ते पाऊणच्या सुमारास कुर्ला येथील एससीएलआर ब्रिजवरील उत्तर वाहिनीवर झाला. अनिरुद्ध त्रिविक्रम आचार्य हा तरुण कुर्ला येथील नेहरुनगर, केदारनाथ मंदिराजवळील गणेश कृपा इमारतीमध्ये राहतो. मृत त्रिविक्रम आचार्य हे त्याचे वडिल असून ते पुजारी म्हणून काम करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते त्यांच्या कामासाठी घरातून निघाले होते. दुपारी ते त्यांची अॅक्टिव्हा बाईक एससीएलआर ब्रिजवरुन जात होती. यावेळी भरवेगात जाणार्या एका बेस्ट बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात त्यांची बाईक स्लीप झाली आणि ते बाईकवरुन पडले होते.
याच दरम्यान बसच्या चाकाखाली आल्याने त्रिविक्रम आचार्य हे गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात जखमी झालेल्या त्रिविक्रम यांना तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असतानाच दुपारी पावणेदोन वाजता त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आचार्य कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.
याप्रकरणी अनिरुद्ध आचार्य याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी बेस्ट बसचालक कमलेशकुमार बरणवाल याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून त्रिविक्रम आचार्य यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले.