जे. डब्ल्यू मेरियट हॉटेलचे एसी स्क्रॅप देण्याच्या बहाण्याने गंडा
46 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 सप्टेंबर 2025
मुंबई, – पुण्यातील जे. डब्ल्यू मेरियट हॉटेलच्या एसी स्क्रॅप देण्याचे आमिष दाखवून कुर्ल्यातील एका स्क्रॅप व्यावसायिकाची त्यांच्या परिचित व्यावसायिक पिता-पूत्राने सुमारे 46 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी करीम खान आणि अहमद करीम खान ऊर्फ राजू अशी या पिता-पूत्राविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
इम्रान अब्दुल मन्नान खान हे कुर्ला येथे राहत असून स्क्रॅप ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. तन्वीर इब्राहिम शेख हे त्यांचे मित्र असून त्यांचा पार्टनरशीपमध्ये स्क्रॅपचा व्यवसाय आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या मित्राने त्यांची ओळख करीम आणि त्याचा मुलगा अहमद खानशी करुन दिली होती. त्यांचाही स्क्रॅपचा व्यवसाय असून त्यांच्यासोबत पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले होते. त्यामुळे ते करीमसोबत त्यांच्या गोवा येथील गोदामाची पाहण्यासाठी गेले होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांच्याशी व्यवसाय सुरु केला होता. या पिता-पूत्रांचा व्यवहार चांगला वाटल्याने त्यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली होती.
मार्च 2024 रोजी करीम आणि अहमद हे दोघेही कुर्ला येथे आले होते. यावेळी त्यांनी त्यांना पुण्यातील जे. डब्ल्यू मेरियट हॉटेलचे एसीचे स्क्रॅप विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते कंत्राट त्यांना देण्याचे आश्वासन देत त्यांनी त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. हॉटेलच्या सुमारे 61 लाखांचा सर्व एसी स्कॅप त्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्यात 595 इंडोर आणि 85 आऊट डोअर एसीचा समावेश होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून इम्रान खान हे त्यांच्यासोबत पुण्याला जे. डब्ल्यू मेरियन हॉटेलमध्ये गेले होते. तिथे त्यांनी त्यांना काही स्क्रॅप माल दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता.
काही मजुरांना कामावर लावून त्यांना स्क्रॅप मुंबईत पाठविण्याची व्यवस्था करतो असे सांगून त्यांना आधी काही रक्कम ट्रान्स्फर करावी लागेल असे सांगितले. हॉटेलच्या मालकाला पैसे दिल्याशिवाय स्क्रॅप मिळणार नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांचा पार्टनर तन्वीर शेखशी सविस्तर चर्चा करुन करीम आणि अहमद यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना 35 लाख 58 हजार रुपये टप्याटप्याने दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने एसी स्क्रॅपच्या मालाची डिलीव्हरी केली नव्हती. विारणा केल्यानंतर त्यांनी सर्व माल काढण्यात आला असून त्यांना आणखीन काही रक्कम द्यावे लागणार आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांना पुन्हा अकरा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.
मात्र ही रक्कम पाठविल्यानंतर करीम आणि अहमद यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. विविध कारण सांगून ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. पुण्यातील जे. डब्ल्यू मेरियट हॉटेलच्या एसी स्क्रॅपचा माल देण्याचे आमिष दाखवून या पिता-पूत्रांनी त्यांच्याकडून 46 लाख 58 हजार रुपये घेतले होते, मात्र स्क्रॅप मालाची डिलीव्हरी न करता इम्रान खान यांची फसवणुक केली होती. पैशांची मागणी करुनही त्यांनी त्यांना दिलेले पेमेंट परत केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच इम्रान खान यांनी विनोबा भावे नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून करीम खान आणि अहमद खान यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन्ही आरोपी पिता-पूत्रांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.