मशिदीच्या नूतनीकरणासाठी एक कोटीच्या खंडणीसाठी धमकी
सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौघांची पोलिसांकडून चौकशी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मशिदीच्या नूतनीकरणासाठी एक कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आयुब दादामियॉं शेख, मोहम्मद अस्लम शब्बीर हसन अस्लम शेख, अब्दुल ताहिर मुनीर खान आणि तन्वीर अहमद अनीस अहमद शेख अशी या चौघांची नावे आहेत. चौकशीनंतर या चौघांनाही ३५ (३) ची नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या गुन्हयांत अब्दुल रेतीवाला आणि नदीम हेल्पर या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
इरफान इक्बाल भाटी हे व्यावसायिक असून ते जोगेश्वरी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. कुर्ला येथील सम्राट अशोक मार्ग, उमरवाडी परिसरात त्यांच्या एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ रोजी एफ विंग या इमारतीचे बांधकाम सुरु असताना काही लोकांनी इमारतीमध्ये प्रवेश करुन सहाव्या मजल्यावर काम करणार्या काम करणार्या कामगारांना काम करण्यापासून रोखले. यावेळी अब्दुल रेतीवाला याने इरफान भाटी यांच्या बांधकाम साईटवरील सुपरवायझर जमीर अन्सारी यांना तुझ्या मालकाला एक कोटी रुपये द्यावे लागतील. मशिदीच्या फिनिशिंगचे काम सुरु असून ही रक्कम मशिदच्या ट्रस्टी कार्यालयात आणून दे. नाहीतर त्यांना तिथे बांधकाम करता येणार नाही. आम्ही कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. तसेच त्यांना शारीरिक इजा पोहचविण्याची धमकी देऊन ते सर्वजण निघून गेले होते.
या घटनेनंतर जमीर अन्सारीने ही माहिती इरफान भाटी यांना दिली होती. या व्यक्तींकडून त्यांना सतत एक कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली जात होती. मशिदीच्या नावाने सतत धमकी दिली जात असल्याने त्यांनी चुन्नाभट्टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चुन्नाभट्टी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आयुब शेख, मोहम्मद अस्लम शेख, अब्दुल ताहिर खान आणि तन्वीर शेख या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच दोषीवर अटकेची कारवाई करुन त्यांना लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.