लग्नासाठी तगादा लावून विवाहीत महिलेचे अपहरण

कुर्ला येथील घटना; आरोपी प्रियकराला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मे २०२४
मुंबई, – लग्नासाठी तगादा लावून एका विवाहीत महिलेचे अपहरण झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. या महिलेच्या सतर्कमुळे तिच्या पतीसह चुन्नाभट्टी पोलिसांनी तिच्यासह तिच्या मुलांची नाशिकच्या एका लॉजमधून सुटका केली. यावेळी तिचे अपहरण करणार्‍या आरोपी प्रियकर आयाज याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरणासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आयाज हा बळीत महिलेवर एकतर्फी प्रेम करत असून तिने त्याच्याशी लग्न केले नाहीतर तो तिच्या कुटुंबियासह स्वतला दुखापत करणार असल्याची धमकी देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

२६ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या सासरे, पती आणि तीन मुलांसोबत कुर्ला येथे राहते. तिचा पती पीओपीचे काम करतो. याच परिसरात आयाज हा त्याच्या पत्नीसोबत राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. तिच्या पती आणि दिरासोबत चांगली मैत्री असल्याने त्याने त्यांच्याकडून तिचा मोबाईल क्रमांक मिळविला होता. त्यानंतर तो तिला फोन करत होता. तो तिच्या परिचित आणि एकाच परिसरात राहत असल्याने तीदेखील त्याच्याशी बोलत होती. काही दिवसांनी तिला तो तिच्यावर प्रेम करत असल्याचे समजले. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती, मात्र तिने त्यास नकार दिला होता. त्यामुळे तो तिच्यावर लग्नासाठी सतत दबाव आणत होता. तिने त्याच्याशी लग्न केले नाहीतर तो तिच्या कुटुंबियांना तसेच स्वतला दुखापत करण्याची धमकी देत होता. तिने त्याला अनेकदा समजविण्याचा प्रयत्न करुनही तो तिच्याशी लग्न करण्यावरुन ठाम होता. गेल्या आठवड्यात ती त्याच्या मावशीच्या घरी गेली होती. यावेळी तिने त्याची पुन्हा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या दोघांना आयाजच्या पत्नीने पाहिले होते. त्यानंतर तिने त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात केली होती. त्यातून तिने तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. या बदनामीमुळे त्याने तिला घरातून पळून जाऊ, नाहीतर स्थानिक लोक आपल्याला जिवे मारतील अशी भीती घालून तिला पळवून नेले होते.

कुर्ला येथून तो तिला उरण आणि नंतर ते दोघेही नाशिकला घेऊन गेला. नाशिक येथे ती तिच्या मुलासोबत एका लॉजमध्ये राहत होती. तिथेही त्याने तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. यावेळी तिने तिला तिच्या घरी सोडण्याचीही विनंती केली होती. मात्र तो तिला सोडण्यास नकार नव्हता. त्यामुळे तिने तिच्या पतीला घडलेला प्रकार सांगून नाशिकच्या लॉजची माहिती दिली होती. या माहितीनंतर चुन्नाभट्टी पोलिसांनी तिथे छापा टाकून या महिलेसह तिच्या मुलाची सुटका करुन आयाजला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आयाजविरुद्ध ३६६, ५०४, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पालिसांनी अटक केली. तक्रारदार महिलेसह तिच्या मुलांना तिच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page