कुर्ला येथील मंदिरात चोरी करणार्या तिघांविरुद्ध गुन्हा
एका आरोपीला अटक तर पळालेल्या दोघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कुर्ला येथील साईबाबा मंदिरात झालेल्या चोरी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत साई गणेश खांडेकर या आरोपीस कुर्ला पोलिसांनी अटक केली तर पळालेल्या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यात कुणाल निलेश कदम आणि सिद्धार्थ योगेश काबळे यांचा समावेश आहे.
दिपक विसंजी सावला हे कुर्ला येथील न्यू मिल रोड, संभाजी चौक, साई सदन चाळीत राहतात. त्यांचा किराणा मालाचे एक दुकान आहे. याच परिसरात एक प्रसिद्ध साईबाबा मंदिर आहे. याच मंदिरात सेवा म्हणून ते साफसफाईचे काम करतात. १६ नोव्हेंबरला ते नेहमीप्रमाणे सफाईसाठी मंदिरात गेले होते. यावेळी त्यांना मंदिरात काही अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करुन स्टिल पत्र्याच्या दानपेटीतून सुमारे ४० हजाराची कॅश चोरी करुन पलायन केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती मंदिरातील पदाधिकार्यांना दिली होती. विधानसभा निवडणुकीमुळे त्यांनी चोरीची तक्रार केली नव्हती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांनी घडलेला प्रकार कुर्ला पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी साई खांडेकर याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने कुणाल कदम आणि सिद्धार्थ कांबळे यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत नंतर साईला पोलिसांनी अटक केली तर इतर दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.