सुट्टे पैसे देण्यावरुन तरुणीचा बुकींग क्लार्ककडून विनयभंग
कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील घटना
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जून २०२४
मुंबई, – तिकिट काढताना सुट्टे पैसे देण्यावरुन झालेल्या वादातून एका २३ वर्षांच्या तरुणीची बुकींग क्लार्कने विनयभंग केल्याची घटना कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात घडली. नितेश अनासाने असे क्लार्कचे नाव असून त्याने तिच्या कानशिलात लगावून आक्षेपार्ह शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दुजोरा दिला आहे.
तक्रारदार तरुणी ही घाटकोपर येथील नित्यानंदनगर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. शनिवारी रात्री साडेआठ वाजता ती तिच्या भावासोबत कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आली होती. तिकिट बुकींग करताना तिच्याकडे बुकींग क्लार्क नितेशने सुट्टे पैशांच्या मागणी केली. तिने सुट्टे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपास गेला की नितेश हा त्याच्या केबीनमधून बाहेर आला आणि त्याने तरुणीला तिच्या भावासमोरच अश्लील शिवीगाळ केली. तिच्या कानशिलात लगावली. मारहाण करताना त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी या दोघांनाही चौकशीसाठी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. यावेळी या तरुणीने घडलेला प्रकार सांगून नितेशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी गंभीर दखल घेत आरोपी क्लार्कविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३५४, ५०९ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच नितेशला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.