मनपामध्ये तक्रार केली म्हणून ५० वर्षांच्या व्यक्तीची हत्या
हत्येच्या गुन्ह्यांत महिलेसह तिच्या तीन मुलांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – महानगरपालिकेच्या सफाई कर्मचार्यांना स्वच्छता करण्यास मनाई करणार्या महिलांविरुद्ध मनपामध्ये तक्रार केली म्हणून झालेल्या वादातून काझम हुसैन मिर्झा बेग या ५० वर्षांच्या व्यक्तीची मारहाणीसह गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करुन एका महिलेसह तिच्या तिन्ही मुलांना अटक केली आहे. रोशन जहेरा शेख ऊर्फ रुबीना, सफदर हुसैन सय्यद, शबरेज हुसैन सय्यद आणि वासिफ हुसैन सय्यद अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वाअकरा वाजता कुर्ला येथील मॅच फॅक्टरी लेन, हुसैनी कंपाऊंड परिसरात घडली. याच परिसरात ५४ वर्षांचे इशाक अब्बास बेग हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा एक भाऊ काझम तर दुसरा भाऊ इझहार कुर्ला आणि तिसरा भाऊ तन्वील हा गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. त्यांच्याच शेजारी जाफर हुसैन शेख यांचे कुटुंबिय राहत असून ते त्यांचे मामा आहेत. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. तेव्हापासून तिथे त्यांची मामी रोशन आणि तिचे तीन मुले सफदर, शबरेज आणि वासिफ हे राहत आहेत. या परिसरात रोशन ही मनपाच्या सफाई कर्मचार्यांना साफसफाई करु देत नव्हती. त्यामुळे इशाक बेग यांनी त्यांच्याविरुद्ध महानगरपालिकेत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेचे काही अधिकारी तिथे स्वच्छता सर्व्हे करण्यासाठी आले होते. संबंधित अधिकारी रोशन शेख आणि रुक्साना सय्यद यांच्याशी चर्चा करत होते.
याच दरम्यान तिथे इशाक बेग आले. त्यांना पाहताच या दोघींनी शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. या भांडणानंतर मनपा कर्मचारी तेथून निघून गेले. काही वेळानंतर तिथे त्यांची पत्नी मोमीना आणि भाऊ काझम आले होते. यावेळी रोशन व तिचे तिन्ही मुले सफदर, शबरेज आणि वासिफ यांनी काझम याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर बसून त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात काझम हा बेशुद्ध झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकणी इशाक बेग यांची जबानी नोंदवून पोलिसांनी शेख कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रोशनसह तिच्या तिन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.