६५ वर्षांच्या वयोवृद्ध आईची मुलीकडून चाकूने भोसकून हत्या
बहिणीचे कौतुक करते म्हणून हत्या करणार्या मुलीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जानेवारी २०२५
मुंबई, – कुर्ला येथील राहत्या घरी ६५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच मुलीने हत्या चाकूने भोसकून हत्या केली. साबीराबानो असगर शेख असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिची मुलगी रेश्मा मुज्जफर काझी (४१) हिला चुन्नाभट्टी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला कुर्ला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बहिणीचे कौतुक करते म्हणून रेश्माने तिच्याच आईची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
जैनब्बी नौशाद कुरेशी ही महिला कुर्ला येथील कुरेशीनगर, अनहरुण हक्क चाळीत राहत असून भायखळा येथे तिचा कांदे-बटाटे विक्रीचा व्यवसाय आहे. साबीराबानो ही तिची आई असून ती तिचा भाऊ अख्तर शेख याच्यासोबत कळवा परिसरात राहत होती. तिची मोठी बहिण फातिमा पुणे तर दुसरी बहिण रेश्मा ही तिच्या मुलासोबत तिच्याच शेजारील कुरेशीनगर, हाजी जब्बार इमारतीच्या फ्लॅट क्रमांक २०९ मध्ये राहते. अनेकदा साबीराबानू ही तिच्यासह रेश्माच्या घरी येत होती. ती तिच्या आईला खर्चासह औषधांसाठी नियमित पैसे देत होती. त्यामुळे ती तिच्याकडे जास्त कालावधीसाठी राहत होती. कुटुंबातील इतर सदस्याकडे तिचे नेहमीच कौतुक करत होती. त्याचा तिची बहिण रेश्माला प्रचंड राग होता. याच कारणावरुन तिने तिच्याशी अनेकदा वाद घातला होता.
तीन वर्षांपूर्वी या वादानंतर रेश्माने जैनब्बीविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसात तक्रार केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून साबीराबानो हिच्या डोळ्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यामुळे ती जैनब्बी हिच्याकडे राहत होती. यावेळी आईला भेटण्यासाठी रेश्मा अधूनमधून तिथे येत होती. या भेटीदरम्यान ती तिला नेहमी टोमणे मारुन तिच्याशी विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करत होती. गुरुवारी साबीराबानो ही रेश्माच्या घरी होती. सायंकाळी साडेसहा वाजता जैनब्बीच्या कौतुकावरुन रेश्मा आणि साबीनाबानो यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच रागातून तिने तिच्या आईवर घरातून चाकूने वार केले होते. त्यात साबीराबानो ही गंभीररीत्या जखमी झाली होती.
तिच्या पोटाला, गळ्याला,ख हाताला आणि दंडाला गंभीर दुखापत झाली होती. तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जैनब्बीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर रेश्मा काझीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर तिला शुक्रवारी दुपारी कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी रेश्माला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बहिणीचे सतत होणारे गुणगाण, कौतुकाच्या रागातून रेश्माने तिची आई साबीराबानोची चाकूने भोसकून हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.