मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कामावरुन पती-पत्नीच्या भांडणावरुन चार वर्षांच्या मुलीचा नाहक जीव गेल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. मुलीला जमिनीवर फेंकून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी पित्याला विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली. परवेज फकुरुद्दीन सिद्धीकी असे या ३६ वर्षीय आरोपी पित्याचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजता कुर्ला येथील विनोबा भावे नगर, एलआयजी कॉलनीतीलत घडली. याच परिसरातील इमारत क्रमांक ३६, रुम क्रमांक दोनमध्ये सबा ही महिला तिचा पती परवेज आणि चार वर्षांची मुलगी आफिया यांच्यासोबत राहते. परवेज हा काहीच कामधंदा करत नाही. दिवसभर घरी बसून राहतो. याच कारणाावरुन पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. शनिवारी दुपारी बारा वाजता याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी रागाच्या भरात त्याने सबाला शिवीगाळ करुन हाताने बेदम मारहाण केली होती. यावेळी तिच्या कुशीत असलेल्या आफियाला त्याने हिसकावून घेतले आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने जमिनीवर फेंकून दिले होते. त्यात आफिया ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सबाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी परवेजविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच परवेजला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पती-पत्नीच्या भांडणात चार वर्षांच्या मुलीचा नाहक जीव गेल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.