48 वर्षांच्या व्यक्तीची अल्पवयीन मुलाकडून चाकूने भोसकून हत्या

रिक्षामध्ये बसण्यास विरोध केला म्हणून हत्या झाल्याचे तपासात उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मार्च 2026
मुंबई, – कुर्ला येथे राहणार्‍या जयराज जयपाल नायडू या 48 वर्षांच्या व्यक्तीची चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून नेहरुनगर पोलिसांनी आरोपी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. रिक्षामध्ये बसण्यास विरोध केल्याने या मुलाने जयराजची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता कुर्ला येथील साबळेनगर, न्यू रेल्वे कॉलनीतील इमारत क्रमांक 105 समोर घडली. याच परिसरात जोशुवा जयराज नायडू हा तरुण राहत असून तो सध्या कॉलेजमध्ये शिकतो. जयराज नायडू हे त्याचे वडिल असून त्यांच्या मालकीची एक ऑटो रिक्षा आहे. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता ते कामावरुन घरी येत होते. यावेळी त्यांच्या रिक्षात आरोपी मुलगा बसण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्यांनी त्याला रिक्षात बसू नकोस असे सांगितले,

त्याला रिक्षामध्ये बसण्यास टोकले म्हणून त्याला त्याचा राग आला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने जयराज यांच्यावर वार केले होते. त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच कोसळले होते. हा प्रकार तिथे उपस्थित स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या जयराज यांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी जोशूवा नायडू याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. रिक्षा बसण्यावरुन झालेल्या वादातून एका चौदा वर्षांच्या मुलाने जयराजची हत्या झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page