मोबाईलला पैसे दिले नाही म्हणून पत्नीवर हातोड्याने हल्ला
कुर्ला येथील घटना; आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ एप्रिल २०२४
मुंबई, – मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून अनिता विजय शर्मा या ३५ वर्षांच्या महिलेवर तिच्याच पतीने हातोड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कुर्ला परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी पती विजय शर्माविरुद्ध कुर्ला पोलिसांनी मारहाण करुन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जखमी अनितावर कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी मध्यरात्री तीन वाजता कुर्ला येथील गरीबमुल्ला चाळ, साईनाथनगरमध्ये घडली. याच परिसरात ३५ वर्षांची अनिता ही तिचा पती विजय आणि तीन मुलांसोबत राहते. विजय हा मिळेल त्या ठिकाणी फर्निचर बनविण्याचे काम करतो तर अनिता एका कपड्याच्या कारखान्यात कामाला आहे. विजयला दारु पिण्याचे व्यसन असल्याने तो नेहमी घरी क्षुल्लक कारणावरुन वाद घालत होता. अनेकदा क्षुल्लक कौटुंबिक कारणासह अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन विजय तिला बेदम मारहाण करत होता. रविवारी सायंकाळी सात वाजता विजयने अनिताकडे मोबाईल घेण्यासाठी पैशांची मागणी केली. यावेळी तिने तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. याच कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली होती. पहाटे तीन वाजता त्याने अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन पुन्हा वाद काढून तिच्याशी भांडण सुरु केले होते. मोबाईलसाठी पैसे देत नसल्याच्या राग त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने तिला लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने घरातील हातोड्याने तिच्या डोक्यावर हल्ला केला. त्यात तिच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. हल्ल्यानंतर हातोडा तिथेच टाकून तो पळून गेला होता.
हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयातून ही माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अनिताची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी तिचा पती विजय शर्मा याच्याविरुद्ध मारहाण करुन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.