मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2025
मुंबई, – मद्यप्राशन करुन एका 43 वर्षांच्या व्यक्तीने त्याच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. याकामी आरोपीला त्याच्या पत्नीने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले असून तिलाही या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मातापित्याला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीने तिच्या वयोवृद्ध आजीला हा प्रकार सांगितल्यानंतर आठ महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
65 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला ही कुर्ला परिसरात राहते. तेरा वर्षांची बळीत ही तिची नात असून ती चेंबूर येथे तिच्या आरोपी आई-वडिलांसोबत राहते. तिचे 43 वर्षांचे वडिल चालक म्हणून काम करत असून त्यांना दारु पिण्याचे व्यसन आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत आरोपी पिता नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन घरी आला होता, यावेळी त्याने दारुच्या नशेत स्वतच्या तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला होता. त्याचा गैरफायदा घेऊन तो तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार करत होता. याकामी पिडीत मुलीची आईदेखील त्याला मदत करुन प्रोत्साहन देत होते. तिनेही तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
जुलै 2024 ते मार्च 2025 या कालावधीत पित्याकडून होणार्या लैगिंक अत्याचाराला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या वयोवृद्ध तक्रारदार आजीला सांगितला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या मुलीसह जावयाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत पिडीत मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह अत्याचार करण्यास मदत करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच रविवारी या दोन्ही माता-पित्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला मेडीकलसाठी नंतर राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रविवारी उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये आरोपी माता पित्याविरुद्ध प्रचंड संतापाची लाट उसळली होती.