महिलांच्या डब्ब्यात बुरखा घालून प्रवास करणारा मनोरुग्ण
नाशिकचा रहिवाशी असलेला आरोपी सिझोफेनियाचा रुग्ण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – फेब्रुवारी महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात घाटकोपर रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्ब्यात बुरखा घालून प्रवास करणार्या आरोपी प्रवाशाला शोधून काढण्यात कुर्ला रेल्वे रेल्वे पोलिसांना यश आले आहे. नाशिकचा रहिवाशी असलेला 57 वर्षांचा आरोपी प्रवाशी मनोरुग्ण असून त्याला सिझोफेनिया आजार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्यावर नियमित उपचार सुरु असून तो अनेकदा घरातून निघून जातो, स्वतला घरात कोंडून ठेवत होता. वेड्याच्या भरात त्याच्याकडून सदरचे कृत्य झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी कुर्ला रेल्वे पोलिसांनी घाटकोपर ते ठाणे रेल्वे स्थानक, ठाणे-इगतपुरी-नाशिक रोड रेल्वे स्थानक तसेच नाशिक शहरातील सुमारे शंभर ते सव्वाशे सीसीटिव्ही फुटेज पाहिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले.
7 फेब्रुवारीला सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक पुरुष प्रवाशी बुरखा घालून घाटकोपर रेल्वे स्थानकात फास्ट लोकलने महिलांच्या डब्ब्यात प्रवास करताना दिसून आला होता. याबाबत प्रवास करणार्या पुरुष प्रवाशाविरुद्ध कोणीही महिलेने रेल्वे पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र या व्हिडीओची पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी गंभीर दखल घेत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस हवालदार जगताप, पोलीस शिपाई गायकवाड यांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घाटकोपर ते ठाणे रेल्वे स्थानकातील काही सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.
या फुटेजवरुन संशयित पुरुष प्रवाशी ठाणे रेल्वे स्थानकात पाटीलपूत्र एक्सप्रेस गाडीच्या जनरल डब्ब्यातून उतरुन लोकलमधील महिलांच्या डब्ब्यात चढल्याचे दिसून आले. त्यामुळे पाटलीपूत्र एक्सप्रेस थांबलेल्या सर्व स्थानकाचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले होते. इगतपुरी आणि नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करताना संबंधित व्यक्ती इगतपुरी रेल्वे स्थानकात जनरल डब्बब्यातून फलाटावरुन चालत पुढील जनरल डब्ब्यात चढल्याचे दिसून आले. पुढे नाशिक रोड रेल्वे स्थानकात शहर हद्दीतून तो फॅन्सिंगवरुन उडी मारुन एक्सप्रेसमध्ये चढल्याचे दिसून आले होते.
तो नाशिकचा रहिवाशी असल्याचे समजून पोलिसांनी नाशिक शहरातील रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारे काही सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या पथकातील उपनिरीक्षक गोसावी, पोलीस हवालदार जगताप, पोलीस शिपाई गायकवाड यांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत तो विचित्रपणे उत्तरे देत होता. त्यामुळे त्याच्या पत्नी आणि मुलांना संबंधित व्हिडीओ दाखवून त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली होती.
या व्हिडीओमधील व्यक्तीचे पकडे, शूज, हातातील पिशवीवरुन तो महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात तो त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत नाशिक रोड येथील गैबानशहा दर्गाजवळील पॅराडाईज अपार्टमेंटध्ये राहत असून हा फ्लॅट थ्री बीएचके आहे. त्याचे बीकॉमपर्यंत शिक्षण झाले असून त्याने एक वर्षांचा आयटीचा कोर्स केला आहे. 2006 ते 2022 या कालावधीत त्याने दुबईतील विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम केले होते.
याच दरम्यान त्याला सिझोफेनिया आजार झाला होता. त्यामुळे त्याच्यावर दुबईतील हॉस्पिटलमध्ये तीन महिने उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर 2022 साली त्याला भारतात पाठविण्यात आले होते. त्याच्यावर संभाजीनगर येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये नियमित उपचार सुरु होते. वेडाच्या भरात तो अचानकपणे कुठेही निघून जातो. तासनतास स्वतला घरात कोंडून ठेवतो.
सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईत शहरात लोकलमध्ये महिला सुरक्षित नाही याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांना तपासात आदेश दिले. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्यासह त्यांच्या पथकाने जवळपास शंभर ते सव्वाशे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन या गुन्ह्यांची उकल केली. मात्र आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे तपासात उघडकीस आल्याने त्याला नोटीससह समज देऊन त्याच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले होते.